
व्यवसायासाठी रक्कम घेऊन चार वर्षांत दुप्पट पैसे देण्याचे आमिष दाखवून तिघांनी एकाला तब्बल 67 लाख 32 हजारांचा गंडा घातला. ही घटना मे 2016 ते 2020 या कालावधीत मार्केटयार्डमध्ये घडली. याप्रकरणी भरत चरणदास जोशी (65), हिरेन भरत जोशी (45), दीपक भरत जोशी (40, सर्व रा. उरळी कांचन) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी आनंद माने (53, रा. धनकवडी) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आनंद आणि भरत एकमेकांचे मित्र आहेत. मे 2016 मध्ये भरत यांनी हिरेन ट्रेडिंग कंपनीत व्यवसायासाठी आनंद यांच्याकडून 33 लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात चार वर्षांत दामदुप्पट देण्याचे आमिष आनंदला दाखविले होते. त्यानंतर भिशीच्या नावाखाली आरोपींनी 2018 ते मे 2020 कालावधीत 34 लाख 32 हजार रुपये घेतले. आरोपींनी भरत यांच्याकडून 67 लाख 32 हजार रुपये घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी मार्केट यार्ड पोलीस तपास करीत आहेत.



























































