हिंदमाता पूरमुक्त कामाचा पहिला टप्पा पूर्ण, अतिवृष्टीत भूमिगत टाक्यांमध्ये पाणी साठवणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अतिवृष्टीत हिंदमाता येथील पावसाचे पाणी साठवण्यासाठी भूमिगत टाक्या बांधण्यात येत असून या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यामुळे दीड तास मुसळधार पाऊस झाला तरी दोन महाकाय टाक्यांमध्ये 30 हजार घनमीटर पावसाचे पाणी साठवता येणार आहे. या कामाची पाहणी आज पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

हिंदमाता परिसर गेल्या अनेक वर्षांपासून पालिकेसाठी आव्हानात्मक ठरला आहे. खोलगट भाग असल्याने अतिवृष्टीत पाणी वाहून जाण्यात अडथळा निर्माण होत असल्याने मोठय़ा प्रमाणात पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून अतिवृष्टीत साचणारे पाणी भूमिगत टाक्यांमध्ये साठवून पाऊस कमी झाल्यानंतर या पाण्याचा निचरा करण्याचे नियोजन आहे. यासाठी नजीकची दोन उद्याने आणि हिंदमाता फ्लायओव्हरच्या खाली भूमिगत टाक्या बांधण्यात येत आहेत. पालिकेच्या या महत्त्वाकांक्षी पहिल्याच प्रकल्पाची पाहणी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी करून कामाचा आढावा घेतला. अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी कामाची माहिती दिली.

दरम्यान, महाजन उद्यानात पालिकेने कला पार्कही साकारले आहे. टाकीच्या बांधकामानंतर या पार्कमधील सुशोभीकरणाच्या कामाचाही आढावा पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला. यावेळी खासदार अरविंद सावंत, पालिकेच्या सभागृहनेत्या विशाखा राऊत, नगरसेवक समाधान सरवणकर, नगरसेविका प्रीती पाटणकर आणि उर्मिला पांचाळ यांच्यासह उपायुक्त (परिमंडळ 2) विजय बालमवार, उपायुक्त (पायाभूत सुविधा) राजेंद्र तळकर, जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर, जी/दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त शरद उघडे, एफ/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त गजानन बेल्लाळे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

पूर्ण कामानंतर तीन तास पावसाचे पाणी साठवता येणार

भूमिगत टाक्यांमुळे या ठिकाणी तासाला 75 मिमी याप्रमाणे तीन तास पाऊस झाला तरी या टाक्यांमध्ये पाणी साठवले जाईल. अतिवृष्टी आणि समुद्राला भरती असताना याचा मोठा फायदा होणार आहे. झेव्हियर्स मैदानात 40 हजार घनमीटर क्षमतेची आणि महाजन उद्यानात 60 हजार घनमीटर क्षमतेची टाकी बांधण्यात येत आहे. या बांधकामाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून आता दोन्ही टाक्या मिळून 30 हजार घनमीटर पाणी साठविण्याची क्षमता तयार झाली आहे.