महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनतर्फे कुमार गटाचे ऑनलाईन शिबीर संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या प्रशिक्षण समितीने राज्यातील उदयोन्मुख खेळाडूंसाठी नुकतेच प्रोत्साहन आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण शिबिराचे ऑनलाईन आयोजन केले. कोरोनामुळे खेळाडूंचा सराव बंद होता. त्यामुळे त्यांचे नुकसान होत होते. हे लक्षात घेऊन प्रशिक्षण समिती प्रमुख अर्जुन पुरस्कारप्राप्त शकुंतला खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर पार पडले. प्रशिक्षण समिती सचिव जिजामाता पुरस्कारप्राप्त सिमरत गायकवाड व शिबिराची जबाबदारी घेतलेले एनआयएस प्रशिक्षक दीपक पाटील यांच्या सहाय्याने कबड्डीत उज्ज्वल भविष्य असलेल्या कुमार व कुमारी खेळाडूंसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबीर यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण समिती सदस्य बजरंग परदेसी, अयुब पठाण, प्रशांत सुर्वे, भरत शिलीमकर, प्रताप शेट्टी, गोविंद अवचर या सदस्यांचेही सहकार्य लाभले. या शिबिरासाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कार्याध्यक्ष-खासदार गजानन कीर्तिकर, उपाध्यक्ष शशिकांत गाडे व नेत्रा राजेशिर्के, सरकार्यवाह आस्वाद पाटील, कोषाध्यक्ष मंगल पांडे यांनी शुभेच्छा दिल्या.