दिल्लीत आज विरोधकांची ब्रेकफास्ट मीटिंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कृषी कायदे, पेगॅसस हेरगिरी या विषयांवर चर्चेची मागणी करत विरोधकांनी संसदेत मोदी सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. याचदरम्यान दिल्लीत उद्या 14 हून अधिक विरोधी पक्षांची बेकफास्ट मीटिंग बोलविण्यात आली आहे.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात  विरोधी पक्षाच्या नेत्यांची मोट बांधण्याचे प्रयत्न वेगवेगळय़ा पक्षांचे नेते करताना दिसत आहेत. तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच एक धावता दिल्ली दौरा केला. त्यापाठोपाठ कॉँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी सकाळी विरोधी पक्षाच्या नेत्यांना चहापानाचं आमंत्रण दिलंय.

दिल्लीतील ‘कॉन्स्टिटय़ुशन क्लब’मध्ये होणाऱया या बेकफास्ट मीटिंगला विरोधी पक्षांचे नेते आणि त्यांचे सहकारी खासदार सहभागी होतील. जशी संसदेत सर्वपक्षीय बैठक भरते तसेच सर्व भेटतील, अशी माहिती काँग्रेसचे नेते आणि राज्यसभेतील विरोधी गटाचे नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली. या बैठकीत कृषी कायदे, पेगॅसस हेरगिरीच्या मुद्यावर संसदेबाहेर ‘मॉक पार्लमेंट’ भरविण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.