तरुणाच्या छातीत खुपसली कबाबची गरम सळई, मोबाईल दुरुस्तीवरुन झाला होता वाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोबाईल नीट दुरुस्त न केल्याची विचारणा केली असता त्यातून झालेल्या वादातून चौघांनी मिळून दोघा भावांना जबर मारहाण केली. यापैकी एकाच्या छातीत कबाबची सळई घुसल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

अकबर अली व त्याचा भाऊ मोहम्मद हुसैन यांनी ते राहत असलेल्या मंडाळा येथील जुबेर मोबाईल शॉपमध्ये मोबाईल दुरुस्तीसाठी दिला होता. परंतु मोबाईल नीट दुरुस्त न झाल्याने दोघे भाऊ त्याबाबत विचारणा करण्यासाठी दुकानावर गेले. त्या वेळी मोबाईल दुरुस्तीवरून त्यांचा दुकानवाल्याशी वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि चौघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. मारहाणीत कबाबच्या दुकानातील सळई अकबर अलीच्या छातीत घुसली. या हल्ल्यात अकबर अलीचा जागीच मृत्यू झाला.