अनेक गुन्हे दाखल असलेल्या सराईत फरार गुन्हेगाराला अटक, नगर पोलिसांची कामगिरी
खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, मकोका, दंगल अशा गंभीर गुन्हे दाखल असलेला चन्या बेग गँगचा फरार आरोपी गोरख जेधे याला जेरबंद करण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले. पोलिसांनी जेधे याला खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आज अटक केली.
श्रीरामपूर विभागाचे पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कारवाई केली. अनेक गुन्ह्यातील बेग गँगचा फरार आरोपी गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे हा वैजापूर येथे लपून बसला आहे. अशी माहिती संदीप मिटके यांना मिळाली. त्यांनी तातडीने वैजापूर येथे जाऊन एका हॉटेलमधून वैजापूर पोलिसांच्या मदतीने गोरख उर्फ विजय मुन्ना जेधे यास शिताफीने अटक केली. त्याच्यावर श्रीरामपूर पोलिस स्टेशनमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, मारहाण, मोक्का, दंगल अश्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधीक्षक संदीप मिटके, पोलिस निरीक्षक संजय सानप , पोलिस उप निरीक्षक अतुल बोरसे , पोलिस कर्मचारी सुरेश औटी, नितीन शिरसाठ, सुनील दिघे आदींनी केली.






























































