
हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यामध्ये 10 सप्टेंबरपासून मँचेस्टर येथे पाचव्या कसोटीला सुरुवात होणार आहे. पण या महत्त्वाच्या कसोटीआधी हिंदुस्थानी संघाला धक्का बसला आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची आरटीपीसीआर टेस्टही पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे आता अखेरच्या कसोटीसाठी रवी शास्त्री टीम इंडियासोबत नसणार आहेत. रवी शास्त्री यांना दहा दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. याचा अर्थ विराट कोहलीची ब्रिगेड मँचेस्टर कसोटीत मुख्य प्रशिक्षकाविना मैदानात उतरणार आहे.
रवी शास्त्री पुस्तक अनावरण कार्यक्रमाला गेले होते. तेथे इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती. यानंतर रवी शास्त्री यांची रॅपिड अँटिजेन टेस्ट करण्यात आली. रविवारी करण्यात आलेल्या या टेस्टमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यानंतर रवी शास्त्री यांच्या संपर्कात आलेले गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर, फिजियोथेरेपिस्ट नितीन पटेल यांनाही टेस्टला सामोरे जावे लागले.
सपोर्ट स्टाफही विलगीकरणात
भरत अरुण व आर श्रीधर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या दोघांसह नितीन पटेल यांनाही विलगीकरणात राहावे लागणार आहे. रवी शास्त्रींसह या तिघांनाही मँचेस्टर येथे पाचव्या कसोटीसाठी जाता येणार नाही. पण रवी शास्त्री, भरत अरुण व आर श्रीधर हे तिन्ही प्रशिक्षक विराट कोहलीच्या संपर्कात असणार आहेत.
विक्रम राठोडकडे मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रे
रवी शास्त्री यांच्या अनुपस्थितीत सध्याचा फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. योगेश परमार, निक वेब व सोहम देसाई हे फिजियोचे काम पाहणार आहेत. तसेच नेगी, कानडे व दयानंद ‘थ्रो डाऊन’ची जबाबदारी पार पाडतील.




























































