
गणेशोत्सवासाठी रेल्वे, एसटी, खासगी बसेसने हजारो चाकरमानी कोकणात दाखल झाले आहेत. पुढील दोन दिवस चाकरमान्यांचा ओघ असाच राहणार आहे. चाकरमान्यांच्या आगमनामुळे बाजारहाट व इतर साहित्य खरेदासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी झाली आहे. घरोघरी रंगरगोटी, विद्युत रोषणाई, आरास सजावट, गोडधोड पदार्थांची पूर्वतयारी अशी गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. तसेच गणेशमूर्ती शाळांमध्ये मूर्तिकार आता गणेशमूर्तीवर अखेराचा हात फिरवत आहेत.
गेल्यावर्षी कोरोना निर्बंधांमुळे चाकरमान्यांना कोकणात येणे शक्य झाले नव्हते. यंदा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून शासनाने निर्बंधांमध्ये सूट दिली आहे. त्यामुळे चाकरमान्यांमध्ये उत्साह आहे. लाडक्या बाप्पाचा उत्सव साजरा करण्यासाठी चाकरमान्यांसह कोकणवासीय सज्ज झाले आहेत. पुढील दोन दिवसांत लाखो चाकरमानी कोकणात दाखल होणार असून मुंबईकर आणि स्थानिक साधेपणाने भक्तीभावात गणेशोत्सव साजरा करणार आहेत.
गणेशोत्सवात सजावट महत्त्वाची असते. गणपतीच्या आरास तयार करण्याच्या कामात अबालवृद्ध मग्न आहेत. दीड ते अकरा दिवसांसाठी येणार्या बाप्पांच्या बैठकीसाठी खास आरास करण्यात येते. थर्माकोलवर बंदी असल्याने पर्यायी कापडी, लाकडी, कागदी तयार मखरे बाजारात विक्रीसाठी आली आहे. याशिवाय मखराला चोहोबाजूंनी सुभोभित करण्यासाठी रंगीबेरंगी पडदे, झालर, फुलांच्या, मोत्यांच्या माळा उपलब्ध आहेत. गणपतीसाठी शेला, फेटा, पितांबर, पूजेसाठी सोवळे विक्रीसाठी आले आहे.
























































