एमपीडीए कायद्यांतर्गत दोन सराईतांची येरवड्यात रवानगी, वर्षभरात 41 जणांविरुद्ध कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक छायाचित्र

पुणे शहरात  गुन्हेगारी टोळ्या तयार करून खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोडासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या  दोन सराईत गुन्हेगारांविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) एका वर्षासाठी येरवडा कारागृहात  स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. दोघेही सराईत वारजे माळवाडी व भवानी पेठेतील आहेत. शेखर रविंद्र खवळे (वय 20, रा.रामनगर, वारजे) व अरबाज ऊर्फ बबन इक्बाल शेख (वय 23, रा.भवानी पेठ)अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी  वर्षभरात 41 जणांना स्थानबद्ध केले आहे.

सराईत शेखर खवळे हा वारजे माळवाडीमधील गुन्हेगार आहे. त्याच्यासह साथीदारांविरूद्ध खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगा, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती.  भितीपोटी नागरीकही तक्रार देण्यासाठी पुढे येत नव्हते. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर खटके यांनी संबंधीत आरोपीविरुद्ध स्थानबद्दतेची कारवाई करण्याचा प्रस्ताव पाठविला होता. दरम्यान खडक पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार अरबाज ऊर्फ बबन इक्बाल शेख याच्याविरुद्धही गंभीर गुन्हे दाखल आहेत.  त्याच्याविरुद्ध पाच वर्षात 13 गुन्हे दाखल आहेत. स्थानबद्धतेची कारवाई व्हावी, यासाठीचा प्रस्ताव खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी पाठविला होता. त्यानुसार पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी खवळे व शेखविरुद्धच्या ‘एमपीडीए’च्या प्रस्तावाची पडताळणी घेतली. त्यानंतर संबंधीत प्रस्तावाला मंजुरी दिली.