
दादरा-नगर, हवेलीची ही पोटनिवडणूक शिवसेना स्वतःच्या इगोसाठी, पक्ष वाढविण्यासाठी लढत नाही. निवडणूक लढवत आहोत ते डेलकर परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी. ही पोटनिवडणूक का होत आहे याचा विचार करा. इथली तानाशाही कशी मोडून काढता येईल याचा विचार करा. जर एका खासदाराला तानाशाहीचा त्रास होऊ शकतो, तर इथल्या जनतेला या तानाशाहीचा किती त्रास होत असेल. या तानाशाहीविरोधात स्वर्गीय खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या हिमतीने उभ्या आहेत. तेव्हा कलाबेन डेलकर यांना विजयी करून इथली तानाशाही मोडून काढा, असे आवाहन शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज केले.
दादरा-नगर, हवेली लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर यांच्या प्रचारासाठी सिल्व्हासा येथील आदिवासी भवन येथे शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी सभा घेतली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, जर कोणी राजकीय तानाशाहीवाला प्रशासक दादरा- नगर, हवेली इथे येत असेल तर हा देश तानाशाहीवाल्यांना कधीही स्वीकारू शकत नाही हे त्याला दाखवून द्यावे लागेल. ही लढाई एक परिवार, एक उमेदवार किंवा एका महिलेची नाही तर ही आपल्या सर्वांची आहे. जनतेचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण लढत आहोत. जर दिल्ली हलवायची असेल, इथल्या जनतेची ताकद दिल्लीपर्यंत पोहोचवायची असेल तर एकच उमेदवार आपल्याला जिंकून द्यायचा आहे तो कोण आहे, त्या म्हणजे कलाबेन डेलकर.
गाजर वाटप झाले का?
आदित्य ठाकरे यांनी यावेळी भाजपवर निशाणा साधला. आदल्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी येथे येऊन गेले होते. त्याविषयी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, विकास खोटय़ा गोष्टींवर होऊ शकत नाही. काही महाराष्ट्रातील लोक इथे येऊन गेले, असे सांगताना गाजर वाटप झाले का, असा सवाल त्यांनी करताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले, खोटी आश्वासने देऊन गेले. जेव्हा ते आमच्या राज्यात मुख्यमंत्री होते तेव्हा प्रत्येक निवडणुकीत असेच आश्वासन द्यायचे, इथे एक हजार करोड देतो, तिथे सहा हजार करोड देतो. आज मी त्यांच्यावर टीका करायला आलेलो नाही. ही लढाई न्यायाची आहे. इथली जनता सत्यासोबत उभी राहील, खोटय़ासोबत किंवा विश्वासघातकी लोकांसोबत उभी राहणार नाही.
महिला, तरुणांना रोजगार द्यायचा आहे
सिल्व्हासा इथे अनेक उद्योग येत आहेत. उद्योग तेव्हाच येतात जेव्हा येथील नेता हे उद्योग इथे खेचून आणतो. मोहन डेलकर यांनी आपल्या सात टर्ममध्ये जे काम केले आहे, त्यामुळे हे उद्योग इथे येत आहेत. याहीपुढे इथे उद्योग आणि रोजगार आणायचे आहेत. इथले तरुण आणि महिला यांच्या हाताला रोजगार द्यायचा आहे. इथले जे उद्योजक आहेत ते सर्व मुंबईत आहेत. त्यांचे घर तिथे आहे आणि त्यांचे उद्योग इथे आहेत. हे असेच पुढे नेण्यासाठी उद्योग आणि उद्योजकांना एकत्र आणायचे आहे. सिल्व्हासा आणि महाराष्ट्राला एकत्र आणून ही लढाई आपल्याला जिंकायची आहे.
सिल्व्हासा भगवे झाले
22 वर्षांनंतर शिवसेनेच्या प्रचारासाठी आलेल्या आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत शिवसेना नेते पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे सिल्व्हासा येथील एसएसआर मेडिकल कॉलेज येथे हेलिकॉप्टरने उतरले तेव्हा त्यांचे तेथील जनतेकडून जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, सुरज चव्हाण आदी उपस्थित होते. या महाविद्यालयापासून ते आदिवासी भवन येथील सभेपर्यंत रस्त्याच्या दुतार्फा भगवे झेंडे आणि पताकांनी सिल्व्हासा भगवामय झाले होते. 22 वर्षांपूर्वी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दादरा-नगर, हवेली येथे शिवसेना उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळची आठवण अनेकांनी यावेळी बोलून दाखविली. आदिवासी भवन येथे मोहन डेलकर यांचे पुत्र अभिनव डेलकर यांनी आदित्य ठाकरे यांचे जोरदार स्वागत केले. आदित्य ठाकरे यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच मी इथल्या जनतेच्या हृदयातली भाषा बोलायला आलो आहे, असे सांगत उपस्थितांची मने जिंकली. त्यांच्या भाषणाला सभागृहातील उपस्थित प्रचंड जनसमुदायाकडून जोरदार प्रतिसाद मिळत होता. हा प्रचंड उत्साह पाहिल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कलाबेन डेलकर यांचा विजय निश्चित असल्याचे सूतोवाच केले.




























































