‘त्यांना’फक्त अँटिलिया पाहायची होती!, नवी मुंबईतून तिघे ताब्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाचा दोन जणांनी पत्ता विचारल्याने एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना नवी मुंबई येथून ताब्यात घेऊन चौकशी केली. पत्ता विचारण्यामागे काही घातपात नसल्याचे तपासात समोर आले आहे.

सोमवारी दुपारी किल्ला कोर्टासमोर उभ्या असलेल्या एका टॅक्सीचालकाला निळ्या रंगाच्या गाडीतून उतरलेल्या दोघांनी अँटिलियाचा पत्ता विचारला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने टॅक्सी चालकाने याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. पोलिसांनी आझाद मैदान ते पेडर रोड परिसरात नाकाबंदी लावली होती. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून त्या गाडीचा शोध घेत होते. तसेच पोलिसांनी आर्टिस्टकडून त्या दोघांचे स्केच देखील काढले.

सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी नवी मुंबई येथून तिघांना ताब्यात घेतले. टॅक्सी चालकाला पत्ता विचारणारे ते दोघे गुजरातचे रहिवासी असून ते मुंबईत फिरायला आले होते. ऍप्सच्या आधारे ते दोघे मुंबईत काही ठिकाणी गेले होते. त्यांना अँटिलिया पाहायचे होते. पण ऍप्समध्ये बिघाड झाल्याने त्यांनी अँटिलियाचा पत्ता विचारल्याचे तपासात समोर आले आहे.