63 वर्षीय महिलेने आपली संपत्ती रिक्षाचालकाला केली दान, जाणून घ्या काय आहे कारण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओडिशातील एका 63 वर्षीय महिलेने तिची एक कोटी रुपयांची सर्व मालमत्ता एका रिक्षाचालकाला दान केली आहे. मिनाती पटनायक असे या महिलेचे नाव आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, या महिलेने शहरातील सुताहाट भागात असलेले तिचे तीन मजली घर, सोन्याचे दागिने आणि इतर सर्व संपत्ती रिक्षाचालक बुधा समल (वय 50) यांना दान केली आहे. या सर्व संपत्तीची किंमत 1 कोटीच्या घरात असल्याचे बोलले जात आहे. मिनाती पटनायक यांच्या या निर्णयाचे सोशल मीडियावर अनेक नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.

‘एयनआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, आपली संपत्ती रिक्षाचालकाला दान केल्यानंतर एयनआयशी बोलता मिनाती पटनायक म्हणाल्या आहेत की, ”माझे पती आणि मुलीच्या मृत्यूनंतर बुधा समल आणि त्यांचे कुटुंबीय माझी निःस्वार्थ सेवा करत काळजी घेत आहेत, म्हणून मी माझी सर्व संपत्ती त्यांना देत आहे.”

त्या म्हणाल्या, ”बुधा समल याने नेहमीच माझ्या कुटुंबीयांची मदत केली आहे. जरी तो 50 वर्षांचा असला तरी त्याची पत्नी मला आई म्हणून हाक मारते, तर त्याचे मुलं मला आजी म्हणतात. त्याचे साधेपण आणि प्रामाणिकपणासमोर या संपत्तीची काहीच किंमत नाही.” याबाबत बोलताना बुधा समल म्हणाले आहे की, ”मला ही संपत्ती नको होती. मात्र आईंचा (मिनाती) निर्णय झाला होता. आपण त्याच्यासोबत राहावे, असा त्यांचा आग्रह होता. ती माझ्या कुटुंबातील सर्वांवर प्रेम करते.”

मिनाती यांनी सांगितलं की, ”बुधा माझ्या मुलीला शाळेत सोडत असे. आम्हाला जेव्हाही कुठे जाण्यास रिक्षा हवी असल्यास आम्ही त्यालाच बोलवायचो. पुढे माझ्या पती आणि मुलीच्या मृत्यूनंतर माझं बुधा आणि त्याच्या पत्नीवरील अवलंबित्व वाढत गेलं. त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी अनेक कठीण प्रसंगात मला साथ आणि भावनिक आधार दिला आहे. मी हा निर्णय घेतला तेव्हा माझ्या भावंडांमध्ये काहीशी नाराजी होती. मात्र त्यांनी माझा विरोध केला नाही.