
मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी कक्षाने कोल्हापुरात मोठी कारवाई केली. चंदगड तालुक्यातल्या धोलगरवाडीतील एका फार्महाऊसवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत कोटय़वधी किमतीचा एमडी ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला. तसेच घटनास्थळावरून एका ड्रग्जमाफिया महिलेला पकडण्यात आले. एका वकिलाचे नाव या प्रकरणात समोर येत आहे.
धोलगरवाडीतील एका फार्महाऊसवर एमडी ड्रग्जची फॅक्टरी असल्याची खबर मुंबई अमली पदार्थविरोधी कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या फार्महाऊसवर छापा टाकला. सलग तीन दिवस तेथे कारवाई करण्यात आली. मोठय़ा प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा हस्तगत करण्यात आला तर एका ड्रग्ज तस्कर महिलेला पकडण्यात आले. हे फार्महाऊस एका वकिलाचे असल्याचे समजते. त्या वकिलाचे नाव समजू शकले नाही.
























































