मुद्दा – बाबासाहेबांकडून आपण काय शिकलो?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दिवाकर शेजवळ

स्मारके, प्रतीकांचे प्रश्न आणि त्यावरच्या भावनिक आंदोलनांचे जाळे- सापळ्यात यापुढे आंबेडकरी चळवळीला गुरफटून जाऊ द्यायचे नाही तसेच मागास समाजांना हित-भवितव्याच्या अस्सल प्रश्नांवरच लढायला जागृत आणि  सिद्ध करायचे या उद्देशाने ’आंबेडकरी संग्राम’ने महापरिनिर्वाण दिनी 27 कलमी एका अजेंडय़ाचे प्रकाशन चैत्यभूमीवर केले अन् त्याचे वितरणही केले.

हा अजेंडा आंबेडकरी बांधवांच्या हाती देण्यापूर्वीच सामाजिक न्याय खात्याकडील विशेष घटक योजनेच्या – दलित विकासासाठीच्या निधीचे  रक्षण व्हावे आणि त्याच कामी त्या निधीचा पुरेपूर वापर करावा हा मुद्दा आम्ही ऐरणीवर आणला आहे. त्यासाठी चैत्यभूमीवर महापरिनिर्वाण दिनी स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले. त्याला समाजाच्या सर्व थरांतून पाठिंबा मिळाला असून हे अभियान आता राज्यभरात वस्ती-वस्तीत जाणार आहे.

अनुसूचित जाती-जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात सत्ता, शिक्षण, नोकऱ्यांमध्ये सहभाग  आणि विकासासाठी अर्थसंकल्पात वाटा मिळण्याचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला  संविधानिक अधिकार ही मोठी देणगी आहे. मागास समाजाच्या आजवर झालेल्या प्रगतीचे सारे श्रेय त्यालाच जाते. त्या संविधानिक अधिकारांचे रक्षण करण्याइतका मोठा प्रश्न आणि निकडीची लढाई आजघडीला कुठलीच असू शकत नाही.

मागास समाजाचे हित-भवितव्याशी संबंधित अस्सल प्रश्न कोणते आणि आपल्या लढाईचे मार्ग कोणते असावेत, यावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ निश्चितच आली आहे. अशांतता माजवणे, कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून  आपला निःशस्त्र समाज आणि कार्यकर्त्यांवर पाशवी बळाचा वापर करण्याची संधी सरकारी यंत्रणेला, पोलिसांना स्वतःहून देणे, नंतर लोकांना अटकसत्र, खटल्यांच्या चक्रात अडकवणे यात कुठले शहाणपण आले?

खुद्द डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात आपल्या अल्पसंख्य, निःशस्त्र गरीब, दलित समाजाला रस्त्यावर उतरवून शक्ती प्रदर्शनाला भरीस घालणारी अशी किती आंदोलने केली होती? त्यांचा तर सारा कटाक्ष आणि भर हा समाजाला कोणतीही इजा-नुकसान होऊ न देण्याची काळजी वाहण्यावर राहिला होता. समाजाची शक्ती पणाला लावण्यावर, शक्तिपात करण्यावर त्यांची भिस्त कधीच नव्हती. बाबासाहेबांनी आपले कलम, बुद्धिचातुर्य, सरकारशी संवाद, हिताचे कायदे करण्यासाठी आग्रह, पाठपुरावा, प्रसंगी न्यायालयीन लढाई हे मार्ग स्वतःच्या एकटय़ाच्या बळावर अनुसरले आणि न्यायासाठीचे लढे जिंकले होते.

त्यापासून आपण काय शिकलो?

[email protected]