
श्रीनगरमध्ये सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्याने सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणा उजेडात आला आहे. गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना या हल्ल्याबाबत एक दिवस आधीच ऍलर्ट दिला होता. त्या ऍलर्टनंतरही जम्मू-कश्मीर सशस्त्र बलाच्या जवानांना बुलेटप्रूफ नसलेल्या बसमधून ट्रेनिंग कॅम्पमध्ये नेले जात होते. त्यांच्याकडे शस्त्रेही नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. याचदरम्यान हा हल्ला पूर्वनियोजित कट होता, असा दावा कश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी केला आहे. कश्मीर खोऱयात पोलिसांना वारंवार टार्गेट केले जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांना बुलेटप्रूफ वाहने पुरवली जाणार आहेत.दरम्यान, हल्ल्यात जखमी झालेल्या आणखी एका पोलिसाला मंगळवारी वीरमरण आले.



























































