50 हजार फेसबुक अकाउंट हॅक करण्याचा प्रयत्न होतोय, मेटाचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने आपल्या युजर्सचे अकाउंट हॅक करण्याच प्रयत्न झाल्याचा दावा केला आहे. जवळपास 100 हून अधिक देशांच्या 50 हजार अकाउंट्सना लक्ष्य करण्यात आल्याची माहितीही फेसबुकने दिली आहे.

काही देशांच्या सरकारांसाठी काम करणाऱ्या गुप्तहेर संस्था किंवा खासगी संस्थांनी हा प्रयत्न केल्याचा दावा मेटा या कंपनीने केला आहे. मेटाने यासाठी अनेक महिने तपासणी केली. मेटाने दिलेल्या माहितीनुसार, चार देशांमध्ये असलेल्या सात वेगवेगळ्या प्रकारच्या सर्विलंस कंपन्यांनी युजर्सच्या अकाउंट्सना लक्ष्य केलं आहे. त्यासाठी 1500 फेक अकाउंट्स बनवण्यात आली. तसंच, मालवेअर असलेले वेब अॅड्रेसही उपलब्ध करून देण्यात आले. आता ते मेटातर्फे हटवण्यात येत असून या कंपन्यांवरही अॅक्शन घेण्यात येत आहे.

या कंपन्या फेसबुक आणि इन्स्टाग्राममधील युजर्सची माहिती सर्विलंस करण्यासाठी वापरत होत्या. त्यासाठी ते वेगवेगळे स्पायवेअर वापरतात. यात लक्ष्य करण्यासाठी त्यांनी राजकारणी, मानव हक्क कार्यकर्ते, पत्रकार, विरोधी पक्षातील नेते आणि त्यांचे कुटुंबीय यांची यादी ठरवल्याचं मेटाच्या अहवालात म्हटलं आहे.

मेटाच्या सुरक्षा योजना प्रमुख ग्लेशर यांच्या म्हणण्यानुसार, सर्विलंस इंडस्ट्री ही खूप मोठी आहे. असा सर्विलंस एकाच कंपनीतून चालत नाही. एखाद्या प्रणालीत मालवेअर सोडण्यापेक्षाही हे घातक आहे. आतपर्यंत जवळपास 100 देशांतील 50 हजार युजर्सना लक्ष्य केलं गेलं आहे. त्यामुळे अनोळखी लोकांशी बोलण्यापूर्वी किंवा नवीन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी सावध राहण्याचा इशारा मेटाने दिला आहे.