ठसा – प्रतापराव मोतीराम वेलकर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मागील शंभर वर्षांच्या विविध राजकीय, सामाजिक घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेले, स्वातंत्र्योत्तर मुंबईच्या पहिल्या वास्तुरचनेचे प्रमुख म्हणून काम पाहणारे आणि राजकीय, सामाजिक, वैज्ञानिक आणि अन्य क्षेत्रांतील इतिहास संशोधनपर विचार मांडणारे असे प्रतापराव मोतीराम वेलकर. लोकमान्य टिळक यांचे मुंबईतील शिष्य, स्वातंत्र्यसंग्रामातील आघाडीचे नेते, शल्यचिकित्सक डॉ. मोतीराम बाळकृष्ण वेलकर यांचे हे चिरंजीव. त्यामुळे राष्ट्रीय विचारांचे बाळकडू त्यांना घरातूनच लाभले. तसेच सावरकर कुटुंब आणि वेलकर कुटुंब यांचा मागील दोन पिढय़ा चांगला संबंध आहे. गिरगावच्या मराठमोळ्या वातावरणात जन्मलेल्या प्रतापरावांनी स्वातंत्र्यपूर्व काळ प्रत्यक्षात पाहून आपल्या मनात जपून ठेवला होता. पुढे त्यांनी वास्तुरचनाकार म्हणून लंडनमधील A.R. I. B.A.ची पदवी प्राप्त केली आणि मुंबई नगरपालिकेच्या वास्तुरचना विभागात नोकरीस रुजू झाले. उत्तर मुंबई – गोरेगाव ते दहिसर या संपूर्ण परिसराची पहिली रचना त्यांनी केली आहे. तसेच दक्षिण मुंबईतील विविध ठिकाणांची उभारणी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे. त्यांनी नोकरीसोबतच उत्तमोत्तम आर्किटेक्ट घडवण्याचे कार्य 20 वर्षे केले. वास्तुरचनेतील बारकावे अगदी वयाच्या शंभरीत पदार्पण केल्यावरही ते व्यवस्थित सांगायचे.

प्रतापरावांची दुसरी ओळख म्हणजे इतिहासकाराची. उतारवयात जेव्हा माणूस पुढील जीवन निवांत व्यतित करण्याचे ठरवतो तेव्हा प्रतापरावांनी नवीन ध्यास घेतला तो इतिहासलेखनाचा. घरात वडिलांचे बहुमोल साहित्य त्यांनी जपून ठेवले होते. तसेच त्या काळाविषयी त्यांनी स्वतःही साहित्य जमा केले आणि साकार झाले ‘लोकमान्य टिळक आणि डॉक्टर वेलकर’ हे मुंबईच्या राजकीय जीवनावर भाष्य करणारे पुस्तक. ज्येष्ठ पत्रकार अरुण टिकेकर एकदा म्हणाले होते, ‘हा ग्रंथ केळकरकृत टिळक चरित्राची पूर्तता करणारा आहे.’ पुढे जयंतराव टिळकांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘अव्यक्त लोकमान्य’ हा ग्रंथ रचला, ज्यात टिळकांच्या विविध अपरिचित पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच डॉ. नारायणराव सावरकर यांच्यावर ‘तिसरा सावरकर’ हे समग्र चरित्र त्यांनी सिद्ध केले. प्रतापराव अनेकदा म्हणायचे ‘तिन्ही सावरकर बंधू आमच्या घरी येत, त्याचे आता विशेष वाटते.’ याव्यतिरिक्त पाच मुंबईकर, पाठारे प्रभूंचा इतिहास, महाराष्ट्राच्या उज्ज्वल इतिहासाची अक्षम्य उपेक्षा, शुरा मी वंदिले अशा पुस्तकांचे लेखन करून त्यांनी इतिहासातील विविध क्षेत्रांतील व्यक्तिमत्त्व आणि त्यांच्या कार्याविषयी संशोधनपर माहिती प्रसिद्ध केली.

मुंबईतील काळबादेवी परिसरात दोनशे वर्षांपूर्वीचे रामवाडी राममंदिर आहे. त्या रामाच्या साक्षीने 1897 मध्ये मोठा पराक्रम घडला. त्या पराक्रमाची स्मृती म्हणून क्रांतिकारक चापेकर बंधू राष्ट्रीय स्मारक प्रतापरावांनी तिथे उभारले आणि त्याचे उद्घाटन क्रांतिकारक सावरकर बंधू यांचे वंशज विक्रमराव सावरकर यांच्या हस्ते चापेकरांच्या वंशजांच्या उपस्थितीत झाले. तसेच त्या मंदिराचा देदीप्यमान वारसा सांगणारे ‘स्वये श्रीराम प्रभू ऐकती’ हे पुस्तक त्यांनी लिहिले. ओमानमधल्या काही प्राणी, जलचरांना डॉ. आत्माराम सदाशिव जयकरांचे नाव आहे. त्याच्या शोधासाठी ओमानचे काही प्रतिनिधी हिंदुस्थानात माहिती काढत होते. या विषयावरील पंधरा वर्षांच्या संशोधनातून “Allah’s Sanctuary LT. COL. DR. A. S. G. JAYAKAR Research papers Oman” हा प्रबंध प्रतापरावांनी तयार केला आणि तो ओमान सरकारला पाठवण्यात आला. तसेच लेफ्टनंट कर्नल डॉ. कान्होबा कीर्तिकरांच्या वनौषधी विषारी वनस्पतीवरील संशोधन आणि त्यावरील “LT.COL.DR. KIRTIKAR’S POISONOUS PLANTS FOR THERAUPETICAL MEDICINE 1886-1912” हा प्रबंध त्यांनी केला. असे अजूनही काही पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आणि त्यासाठी त्यांना सरकारी आणि खासगी संस्थांनी पुरस्काराने गौरविले. विविध ठिकाणांचे नामकरण प्रतापरावांनी करून घेतले. 26 ऑक्टोबरला त्यांनी शताब्दी वर्षात पदार्पण केले होते. या वयातही ते हा सारा इतिहास उत्स्फूर्तपणे अगदी बारकाव्यांनी सांगत. मे महिन्यात त्यांच्या पत्नी कुंदा वेलकर यांचे निधन झाल्यावर ते काहीसे शांत झाले होते. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ापासून जेवणही बंद झाले होते आणि अखेर सोमवार 20 डिसेंबर 2021 ला राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. अशा ज्येष्ठ आणि कर्मयोगी व्यक्तिमत्त्वास समाज मुकला. त्यांच्या रूपाने राष्ट्रीय विचारांचा एक कार्यरत इतिहासपुरुष काळाच्या पडद्याआड गेला. एक पर्व थांबले!

  • हर्षल देव