लेख – प्रिन्स आणि रेव्ह पार्टी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रसाद वि. प्रभू

गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये रियाधच्या वाळवंटामध्ये जंगी रेव्ह पार्टी झाली. पाच वर्षांपूर्वी सौदी अरेबियामध्ये अशा पार्टीची कल्पनासुद्धा कुणी केली नसती. या पार्टीचा जगभरात गवगवा झाला. ही सारी किमया आहे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची! रुढीवादी परंपरांतून मुक्त होऊन जागतिक वातावरणात मोकळा श्वास घेण्यासाठी आसुसलेल्या सौदी अरेबियन जनतेने प्रिन्स सलमान यांच्या सुधारणांना बराच पाठिंबा दिलेला आहे. रियाधच्या वाळवंटात झालेल्या पहिल्या रेव्ह पार्टीमध्ये इतक्या मोठय़ा संख्येने सौदी नागरिक सामील झाले त्यावरूनच हे दिसून येत आहे.

जगातील सर्वात कट्टर इस्लामी देश सौदी अरेबियामध्ये रेव्ह पार्टी? होय, गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये रियाधच्या वाळवंटामध्ये जंगी रेव्ह पार्टी झाली. पाच वर्षांपूर्वी सौदी अरेबियामध्ये अशा पार्टीची कल्पनासुद्धा कुणी केली नसती. या पार्टीचा जगभरात गवगवा झाला. ही सारी किमया आहे सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची! आपल्या कर्मठ इस्लामी देशाला आधुनिकतेकडे, विकासाकडे आणि नव्या जगात त्यांना घेऊन जायचे आहे. त्यासाठी त्यांचे सुधारणावादी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या डिसेंबरमध्ये अनेक इव्हेंटस् आयोजिले गेले. डिसेंबरमध्ये आयोजित केल्या गेलेल्या ‘द इलेक्ट्रॉनिक म्युझिकल फेस्टिव्हल’ला खूप प्रसिद्धी मिळाली. या महोत्सवाचा एक भाग म्हणून ‘साऊंडस्टॉर्म’ नामक जंगी रेव्ह पार्टी झाली.

या रेव्ह पार्टीमध्ये डीजेच्या तालावर चित्रविचित्र रंगीबेरंगी आणि पाश्चिमात्त्य पोशाख घातलेले स्त्र्ााr-पुरुष बेधुंद नाचले. सौदी युवावर्गाने मोठय़ा उत्साहात सहभाग दर्शवला होता. असे सौदीच्या भूमीवर प्रथमच घडत होते. त्यामुळेच तर जगाचे डोळे विस्फारले. या रेव्ह पार्टीमध्ये 200 कलाकारांचा समावेश होता. त्यामध्ये जागतिक दर्जाचे डीजे एस टीएस्टो, डेव्हिड गुएस्टा आणि अरमिन व्हान बुरेन यांचा समावेश होता. ही रेव्ह पार्टी जणू अमेरिकेतच चालली आहे असा भास व्हावा, असे वर्णन माध्यमांनी केले. डिसेंबरमध्ये सौदीमध्ये फॉर्म्युला वन मोटर शर्यतीचे यशस्वी आयोजन झाले, त्याचप्रमाणे तो दोन आर्ट इव्हेंटचे आयोजन करण्यात आले होते.

डिसेंबरमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांनी सौदी अरेबियाचा दौरा केला. फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांत ज्या घटना घडल्या आणि त्यानंतर मॅक्रोन यांनी फ्रान्समधील मुसलमान समाजावर जे काही निर्बंध आणले, त्यामुळे मुस्लिम जगतात फ्रान्स आणि मॅक्रोन यांच्याविषयी काहीशी चीड आहे. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियासारख्या कट्टर इस्लामी देशाने फ्रान्सच्या अध्यक्षांना बोलवावे आणि त्यांचा पाहुणचार करावा हे विशेषच! पण तेलावर अवलंबून असलेल्या आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला मनोरंजन, पर्यटन आणि इतर पर्याय शोधण्याची प्रिन्स सलमान यांची योजना आहे. त्यासाठीच तर ते सौदी अरेबियामध्ये झपाटय़ाने बदल आणि सुधारणा करीत आहेत. त्यासाठी त्यांना काही तडजोडीही कराव्या लागत आहेत. काही बाबतीत कठोर नियमांना मुरड घालावी लागत आहे, पण मूळ इस्लामी कायदेकानून आणि परंपरा यांना धक्का लागणार नाही याचीही ते दक्षता घेत आहेत. याचेच एक उदाहरण द्यायचे झाल्यास रेव्ह पार्टी चालू असतानाच धार्मिक आचरणासाठी पंधरा मिनिटे ती बंद ठेवण्यात आली आणि नंतर पुढे सुरू करण्यात आली. दुबई, बैरुट, तेल अविव येथील पार्टी कल्चर त्यांनी पाहिलेले आहे. म्हणूनच सौदी अरेबियाला मोठे जागतिक पर्यटन केंद्र बनवण्याचा त्यांचा बेत आहे. त्याचप्रमाणे 2030 पर्यंत सौदी अरेबियाला सर्व दृष्टीने ताकदवान देश बनवण्याचे उद्दिष्ट त्यांनी बाळगले आहे.

पाच मुलांचे पिता असलेले 36 वर्षीय प्रिन्स सलमान हे अतिशय महत्त्वाकांक्षी आहेत. आपली धोरणे, योजना ते प्रसंग पडल्यास निर्दयतेने राबवतात अशी त्यांच्यावर टीका होत असते. ते अजून सौदी अरेबियाचे राजे झालेले नाहीत, पण सर्व सत्तासूत्रे त्यांच्याकडे क्राऊन प्रिन्स या नात्याने एकवटलेली आहेत. त्यांनी ती ज्या प्रकारे आपल्या हाती घेतली यावरून त्यांचा महत्त्वाकांक्षी आणि धाडसी स्वभाव लक्षात येतो. 2015 साली प्रिन्स सलमान यांचे वडील सलमान बिन अब्दुल्ला अझीझ अल सौद हे सौदी अरेबियाचे राजे झाले. सौदी परंपरेनुसार त्यांच्यानंतर राजेपदावर त्यांच्या पुतण्याचा हक्क होता, पण या राजाने दोनच वर्षांत आपला पुतण्या मुहम्मद बिन नायफ अल सौद याला ‘क्राऊन प्रिन्स’ पदावरून काढून टाकले आणि या जागी आपला मुलगा मोहम्मद बिन सलमान अल सौद याची नेमणूक केली. आपल्या वडिलांना तसे करण्यास सलमान यांनीच भाग पाडले अशी कुजबूज अजूनही चालू आहे. आपल्या 86 वर्षीय वृद्ध, आजारी वडिलांच्या वतीने प्रिन्स सलमान यांनीच सारी सत्तासूत्रे हाती घेतली. त्यामुळे सौदी राज परिवारात अस्वस्थता पसरली आहे. आपला दरारा, दहशत, धाक निर्माण करण्यासाठी क्राऊन प्रिन्स सलमान यांनी सौदी राजपरिवारातील काही सदस्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली रियाधच्या हॉटेल रीझ कार्लटनमध्ये डांबून ठेवले होते. त्या वेळी सौदी अरेबियामध्ये प्रचंड खळबळ निर्माण झाली होती.

‘वॉशिंग्टन पोस्ट’चे सौदी पत्रकार जमाल खाशोग्गी यांची हत्या, येमेन युद्धातील नरसंहार, लेबनॉनचे पंतप्रधान साद हरिरी यांना अटक, मेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांचे कथित फोन टॅप प्रकरण, सौदी राजपरिवारातील प्रतिस्पर्धी मोहम्मद बिन नायेफ यांच्यावर देशद्रोहाचा आरोप ठेवणे अशा अनेक घटनांमुळे प्रिन्स सलमान वादग्रस्त ठरले आहेत. पत्रकार जमाल खाशोग्गी यांच्या हत्येशी त्यांचा थेट संबंध असल्याचा आरोप केला गेला आणि जागतिक स्तरावर त्यांची प्रतिमा अत्यंत खराब झाली. आपल्या विरोधकांचा काटा काढण्यासाठी प्रिन्स सलमान यांनी ‘टायगर स्क्वाड’ नावाचे एक पथक तयार केले आहे. त्यांनी आपल्या विरोधकांचा छळ करून त्यांना तुरुंगात डांबले आहे, असा आरोप जागतिक मानव हक्क संघटना आणि इतर संघटना करीत असतात, पण आता सत्तेवरील आपली पकड मजबूत झाल्यावर त्यांनी आपली प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

सत्ता सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांनी मारिया केरी आणि एन्रीक इग्लेशियास, ब्ल्यू मून ग्रुप यांचा पाप कॉन्सर्ट आयोजित केला. सौदीमध्ये एका महिलेचा जाहीर कार्यक्रम होण्याचा हा पहिलाच प्रसंग होता. त्यांनी ई-व्हिसा सिस्टीम सुरू करून आंतरराष्ट्रीय पर्यटकांना देशाचे द्वार खुले केले. प्रथमच महिलांना स्टेडियममध्ये आणि चित्रपटगृहांमध्ये जाण्यासाठी अनुमती दिली. कार्यबलामध्ये महिलांची उपस्थिती वाढवली. महिला वाहनचालकांवरील बंदी उठवली. पुरुषपालक पद्धतीचे महत्त्व कमी केले. धार्मिक पोलिसांच्या अधिकारांवर अंकुश आणला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ज्या सौदी अरेबियावर धार्मिक मूलतत्त्ववाद निर्यात केला आणि त्यातून अल-कायदा, तालिबान, इसिस आणि इतर दहशतवादी गटांचा उदय झाला असा आरोप झाला, त्याच सौदीने आता तबलिघी जमातवर बंदी आणली आहे. तबलिघी हे मोठे प्रस्थ आहे. त्यामुळे खरे म्हणजे इस्लामी जगतात निषेधाचे तीव्र सूर उमटायला हवे होते, पण फक्त पाकिस्तान आणि हिंदुस्थानातील मुस्लिम संघटनांकडून या निर्णयाला विरोध झाला. रुढीवादी परंपरांतून मुक्त होऊन जागतिक वातावरणात मोकळा श्वास घेण्यासाठी आसुसलेल्या सौदी अरेबियन जनतेने प्रिन्स सलमान यांच्या सुधारणांना बराच पाठिंबा दिलेला आहे. रियाधच्या वाळवंटात झालेल्या पहिल्या रेव्ह पार्टीमध्ये इतक्या मोठय़ा संख्येने सौदी नागरिक सामील झाले त्यावरूनच हे दिसून येत आहे.