
राज्यभर गाजलेल्या पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणातील सरकारी पक्षाचा युक्तिवाद येथील प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश सुधाकर यर्लागड्डा यांच्यासमोर पूर्ण झाला. केवळ भावाचा नव्हे, तर बंधुत्वाच्या नात्याचा खून केला आहे. आरोपींनी खुनानंतर मृतदेहाचे तुकडे-तुकडे करून क्रौर्याची परिसीमा गाठली आहे, असा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी न्यायालयासमोर केला.
जवखेडे खालसा येथील संजय, जयश्री आणि त्यांचा मुलगा सुनील जाधव या तिघांची 2014 मध्ये हत्या झाली होती. विशेष सरकारी वकील उमेशचंद्र यादव यांनी या हत्याकांड खटल्यात पाच दिवस सरकारी पक्षाचा युक्तिवाद केला. आरोपींच्या वतीने ऍड. जी. एस. मगरे हे 14 ते 16 फेब्रुवारीदरम्यान बचावाचा युक्तिवाद करणार आहेत. या खटल्यातील साक्षीदार, विविध पंचनामे, तज्ञ पंचांच्या साक्षी, न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे अहवाल आदी पुराव्यांच्या साखळी जोरकसपणे सरकारी पक्षाच्या वतीने मांडली. या आधारे तिहेरी हत्याकांडास हेच आरोपी कारणीभूत असल्याचे ऍड. यादव यांनी न्यायालयासमोर मांडले. यासाठी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे महत्त्वाचे न्यायनिवाडे सादर केले.
या गुह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सुभाष अनमलवार, पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी गुह्याच्या अनुषंगाने केलेले विविध पंचनामे आणि गुह्याशी असणारा थेट संबंध याबाबतचे विवेचन केले. आरोपी प्रशांत, दिलीप आणि अशोक जाधव यांची मानसशास्त्रीय चाचणी गुजरात राज्यातील न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत करण्यात आली होती. या गुन्ह्यात आरोपींना अटक करण्यापूर्वी ही चाचणी करण्यात आली आहे. या चाचण्यांची स्वीकारार्हता आणि त्यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचे 1961 ते 2010 पर्यंतचे महत्त्वाचे न्यायनिवाडे सादर केले. या चाचण्यांमध्ये आरोपींच्या कथनकानुसार वेगवेगळ्या पंचनाम्याच्या अनुषंगाने आरोपींचे दोषीत्व दर्शविणाऱ्या अनेक गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.
आरोपी प्रशांत याने मयताचा शोध घेताना विहिरीत शोध घेण्याचे सुचविले. मयत हे कोठे मंदिरात किंवा नातेवाइकांकडे गेले असतील, हे सुचविले नाही. यावरून आरोपींना मयताचे मृतदेह कोठे टाकले आहेत, याचे ज्ञान होते. आरोपीच्या पायाला जखम झाली होती. परिचारिका सुनीता गर्जे यांनी त्यावर उपचार केले होते. आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आलेली हत्यारे, मयतांच्या अंगावरील जखमासंदर्भात तज्ञ डॉ. ठुबे यांनी दिलेली साक्ष महत्त्वाची आहे. अशोक जाधव याने कपडे हे रॉकेल ओतून जाळले होते. ते पंचांसमक्ष कचरा टाकण्याची जागा उचकून दाखविली होती. मयताचे काही कपडे गाठोड्यात बांधून फेकून दिले होते. हे गाठोडे पोलिसांनी मिळविले आहे. त्यामध्ये जयश्रीची साडी आढळून आली आहे. पुराव्याची साखळी न्यायालयासमोर सादर केली.
आरोपी दिलीप जाधव याने पंचनाम्यात मृतदेह टाकलेली विहीर दाखविली होती. या पंचनाम्यात निशाणी क्रमांक देण्यात आलेला नव्हता. या पंचनाम्यात निशाणी क्रमांक देण्याची मागणी विशेष सरकारी वकील यादव यांनी केली. त्याला आरोपींचे वकील जी. एस. मगरे यांनी हरकत घेतली. त्यावर यादव यांनी गुजरात उच्च न्यायालयाचा न्यायनिवाडा सादर केला. खटल्याचा निकाल लागेपर्यंत निशाणी क्रमांक देता येऊ शकतो, असे या न्यायनिवाड्यात नमूद केलेले आहे.



























































