
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर मेरठमध्ये झालेल्या हल्ल्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सोमवारी राज्यसभेत माहिती दिली. हापूडमध्ये ओवैसी यांचा कोणताही कार्यक्रम नव्हता. तसेच ते कोणत्या मार्गाने जाणार आहेत, याबाबत प्रशासनाला कोणतीही माहिती नव्हती. ओवैसी यांनी सुरक्षा व्यवस्था स्विकारावी आणि आमची चिंता मिटवावी, असे आवाहन शाह यांनी ओवैसी यांना केले
ओवैसी 3 फेब्रुवारीला 5.30 वाजता जनसंपर्क करून परतत होते. तेव्हा 2 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर गाडीवर गोळीबार केला. या घटनेचे तीन प्रत्यत्रदर्शी आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे दोन अनधिकृत पिस्तूल आणि एक ऑल्टो कार जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक पथक अधिक तपास करत असून पुरावे जमा करण्याचे काम सुरू असल्याचे शाह यांनी सांगितले.
ओवैसी यांनी सुरक्षा व्यवस्था घेण्यास नकार दिला आहे. आपण या सदनात ओवैसी यांना विनंती करतो की त्यांनी सुरक्षा व्यवस्था स्विकारावी आणि आमची चिंता मिटवावी, असे शाह म्हणाले. ओवैसी यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात येत आहे. त्यात बुलेटप्रुफ कार आणि सीआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. मात्र, ओवैसी यांनी सुरक्षा व्यवस्था स्विकारण्यास नकार दिला आहे. आपल्याला बुलेट प्रुफ गाडी ठेवण्याची परवानगी द्यावी. तसेच आपल्याकडे शस्त्र परवाना आहे. त्यामुळे शस्त्र बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करणार असल्याचे ओवैसी यांनी सांगितले.




























































