कोणत्याही चार्जरने स्मार्टफोन चार्ज करताय? होऊ शकतं हे नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्मार्टफोन नवीन असताना आपण त्याच्या चार्जरने चार्जिंग करतो. पण, जसजसा फोन जुना होतो, तसतसं आपण कोणत्याही चार्जरचा वापर फोन चार्जिंगसाठी करतो. पण, असं करणं नुकसानदायक ठरू शकतं.

स्मार्टफोनला नेहमी त्याचाच चार्जर लावणं गरजेचं असतं. कोणत्याही चार्जरला लावून तुमचा फोन चार्ज तर होईल. पण त्याचा दीर्घकालीन परिणाम तुमच्या फोनच्या बॅटरीवर होतो. कारण प्रत्येक चार्जरची चार्जिंग करण्याची क्षमता वेगवेगळी असते आणि फोनची चार्ज होण्याची क्षमताही फोनगणिक वेगवेगळी असते. अशावेळी चुकीचा चार्जर वापरणं महागात पडू शकतं.

चार्जरचं काम तुमच्या फोनला चार्ज करणं इतकंच असलं तरी ते दिसतं तेवढं सोपं काम नसतं. कारण, चार्जर तुमच्या फोनमध्ये चार्जिंग देताना आधी विद्युतप्रवाह स्वीकारतो आणि त्याचं चार्जिंग उर्जेत रुपांतरण करतो. मग अॅडॉप्टरच्या साहाय्याने फोन चार्ज होतो.

तुम्ही जर चुकीचा चार्जर वापरलात तर तुमच्या बॅटरीवर त्याचा विपरित परिणाम होतो. फोनसोबत येणाऱ्या चार्जरला फोन योग्य पद्धतीने चार्ज करण्यासाठीच बनवण्यात आलेलं असतं. तसंच हल्ली वेगवान चार्जिंगचा पर्याय उपलब्ध आहे. अशा वेळी दुसऱ्या चार्जरमुळे बॅटरीच्या क्षमतेला हानी पोहोचू शकते.

तसंच, चार्जर सोबत योग्य वायर वापरणं गरजेचं असतं. फोनसोबत मिळणारी वायर खराब झाल्यास समान कंपनीची वायर चार्जरला लावावी. हलक्या दर्जाची वायर देखील फोनची बॅटरी खराब करू शकते.