
नगर जिल्ह्यात 28 वर्षांपासून विविध कारवायांमध्ये जप्त केलेला तब्बल 997 किलो 274 ग्रॅम गांजा न्यायालयाच्या परवानगीनंतर नष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे.
अमलीपदार्थ विरोधी कायदा 1985 अन्वये नगर जिह्यातील विविध पोलीस स्टेशनमध्ये 1994 ते 2014 पर्यंत दाखल 32 गुह्यांत एकूण 997 किलो 274 ग्रॅम गांजा व अफू जप्त करण्यात आला होता. या गुह्यांचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर न्यायालयाने मुद्देमाल नष्ट करण्याबाबत आदेश दिले होते.
पोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, पोलीस उपअधीक्षक (गृह) मेघश्याम डांगे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक फौजदार विष्णू घोडेचोर, हेडकॉन्स्टेबल भाऊसाहेब कुरुंद, सखाराम मोटे, शरद बुधवंत, देवेंद्र शेलार, पोलीस नाईक शंकर चौधरी, कॉन्स्टेबल जयराम जंगले, अर्जुन बडे व बबन बेरड यांनी प्रदीर्घ काळापासून जप्त असलेला 997 किलो 274 ग्रॅम गांजा नष्ट करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. शनिवारी (दि. 26) रांजणगाव एमआयडीसी येथील कंपनीत हा गांजा नष्ट करण्यात आला आहे.


























































