रशियन फौजांचे जोरदार हल्ले! बॉम्ब हल्ल्यात हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खाण्यापिण्याच्या शोधात कर्नाटकातील नवीन शेखरप्पा ग्यानगौडर हा विद्यार्थी हॉस्टेलच्या बंकरबाहेर पडला असता बॉम्बहल्ल्यात त्याचा मृत्यू झाला.

युद्धाच्या सहाव्या दिवशी रशियाने आज युक्रेनवर जोरदार हल्ले केले. आपल्या ताब्यात आलेले खारकीव शहर पुन्हा हातातून निसटल्याने रशिया चवताळला आहे. युव्रेन माघार घेत नसल्याने रशियन लष्कराने तुफान हवाई हल्ले चढवून खारकीवमध्ये विध्वंस केला. रशियन सैनिकांनी केलेल्या बॉम्बहल्ल्यात एका हिंदुस्थानी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या वृत्तानंतर युव्रेनमध्ये अडकून पडलेले हिंदुस्थानी विद्यार्थी आणखीनच भयभीत झाले आहेत. ‘आम्हाला वाचवा…’ अशी आर्त हाक त्यांनी सरकारला दिली आहे.

तातडीने कीव्ह, खारकीव शहर सोडा, हिंदुस्थानी दूतावासाकडून सूचना

कीव्ह, खारकीव, चेर्निहाइव्ह या शहरांवर रशियाचे रणगाडे आग ओकत आहेत. रस्ते आणि इमारतींना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे हिंदुस्थानी दूतावासाकडून कीव्ह, खारकीव, चेर्निहाईव्ह शहरांमधील हिंदुस्थानी नागरिकांना आहेत त्या परिस्थितीत तातडीने शहराबाहेर पडा अशा सूचना देण्यात आल्या आहेत.