लेख – धूलिवंदनाचा संदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रज्ञा कुलकर्णी

फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा किंवा हुताशनी पौर्णिमा होय. आपल्या मराठी महिन्यांमध्ये फाल्गुन हा शेवटचा महिना मानण्यात येतो. शिशिर ऋतूत झालेल्या पानगळीने निर्माण झालेला झाडांचा पालापाचोळा वाळलेल्या झाडांच्या फांद्या, केरकचरा जाळून आपला परिसर स्वच्छ करून आनंदाने वसंत ऋतूचे स्वागत केले जाते. या महिन्यातील सारी सृष्टी ही वसंतऋतूच्या आगमनानं प्रफुल्लित झालेली असते. झाडावेलींना नवी पालवी फुटलेली असते. तऱहेतऱहेच्या फुलांना बहर आलेला असतो. विविध पक्ष्यांचे आणि कोकिळेचे सुमधुर स्वर आसमंतात घुमू लागतात. या साऱया आनंददायी, उत्साही पार्श्वभूमीवर होलिकोत्सव साजरा केला जातो.

आपल्या देशात विविध प्रांतात हा सण वेगळ्या नावांनी आणि कारणांनी साजरा केला जातो. उत्तरेकडे हा सण भगवान श्रीकृष्णांनी वध केलेल्या पूतना नावाच्या राक्षशिणीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. पूतना राक्षशिणीचा पुतळा जाळून आनंदोत्सव होतो. बंगाल प्रांतात होळी हा सण दोलायात्रा या नावाने साजरा करतात. बंगालमध्ये या दिवशी घरोघरी श्रीकृष्णाच्या मूर्तीला झोपाळ्यावर बसवून पूजा करतात. संध्याकाळी कृष्णावर गुलाल उधळून सर्वांना गुलाल वाटतात. नंतर अग्नीची पूजा करून होळी पेटवतात. दक्षिण प्रांतात कामदेवाच्या स्मृतीनिमित्त होळी पेटवली जाते. त्यामागची पौराणिक कथा अशी आहे की, एकदा भगवान शंकर तपःसाधना करत असताना मदन किंवा कामदेवाने शंकराची तपःसाधना भंग पावावी म्हणून शंकराचे लक्ष विचलित करून पार्वतीकडे वेधण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शंकरांनी क्रोधित होऊन आपला तृतीय नेत्र उघडून कामदेवाला जाळून टाकले. कामदेवाची आठवण म्हणून ‘कामण्णा’ नावाचा पुतळा करून तो जाळण्याची प्रथा होळीच्या दिवशी पाळली जाते.

महाराष्ट्रातही होळी पौर्णिमा मोठा प्रमाणात साजरी केली जाते. या दिवशी संध्याकाळी घराबाहेर लाकडे, शेण्या, गोवऱया, झाडांची वाळलेली पाने यांचा ढीग रचून त्यात मधोमध एरंडाच्या झाडाची फांदी उभी करतात. ‘श्री होलिकायै नमः’ या मंत्राने होळीची पूजा करतात. होळीला तीन प्रदक्षिणा घालतात. पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी पेटवली जाते. ताशा, टिमकी, ढोल वाजवून गाणी म्हटली जातात. होळीचा दुसरा दिवस हा धुळवड म्हणून साजरा करतात. या दिवशी होळी दुधाने शांत केली जाते. होळीतील राख सर्वांगास लावून धुळवड खेळतात. होळीत वाळलेल्या झाडांची काष्टे आणि पालापाचोळा जाळलेला असतो. त्याचेही शास्त्र्ााrयदृष्टय़ा औषधी महत्त्व आहे. अशी औषधी रक्षा सर्वांगास लावल्याने उन्हाळा बाधत नाही आणि त्वचा स्वच्छ होते हा यामागचा उद्देश आहे. या उत्सवाच्या निमित्ताने जुने वैरभाव, हेवेदावे, अनिष्ट चालीरिती यांचेही होळीत दहन करून स्वच्छ मनाने, आनंदाने आणि सकारात्मक वृत्तीने आयुष्याला सामोरे जावे हाच या होळी आणि धुळवड या सणामागचा खरा संदेश आहे.