तब्बल 52 वर्षांनी होणार नगर जिल्हा बँकेचे ‘फायर ऑडिट’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्हा सहकारी बँकेच्या नगरमधील मुख्यालय इमारतीचे तब्बल 52 वर्षांनी फायर ऑडिट होणार आहे. अर्थात, दोन दिवसांपूर्वी बँकेच्या तिसऱया मजल्यावरील लेखापरीक्षण विभागाला लागलेल्या आगीमुळे बँकेच्या सत्ताधाऱयांनी तातडीने फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, जिल्हा बँकेत लागलेल्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे दिसत असले तरी तांत्रिक तज्ञांच्या मदतीने आग लागण्याचे नेमके कारण शोधले जात आहे.

शुक्रवारी (दि.1) सायंकाळी सात वाजता बँक इमारतीतील तिसऱया मजल्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशेजारी असलेल्या जिल्हा बँकेच्या ऑडिट विभागाला अचानक आग लागून त्यात आतील फर्निचर, कपाटे, कागदपत्रे, फाईल्स, संगणक जळून खाक झाले आहेत. मनपा व एमआयडीसीच्या अग्निशमन पथकांनी तासभर पाण्याचा मारा करून ही आग आटोक्यात आणली असली, तरी आता या आगीचे नेमके कारण सर्वांच्या उत्सुकतेचे झाले आहे.

बँकेचे अध्यक्ष ऍड. उदय शेळके व उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी शनिवारी सकाळी नगर जिल्हा सहकारी बँकेतील लेखा परीक्षण विभागाला भेट दिली. यावेळी ऍड. शेळके म्हणाले, ही इमारत 1970च्या दशकात बांधलेली आहे. बँकेचे उपाध्यक्ष व आम्ही निर्णय घेतला आहे की या इमारतीचे फायर ऑडिट करून घ्यायचे आहे. त्यात काही दोष असतील तर ते आम्ही सुधारून घेऊ. यापुढे अशी कोणतीही घटना घडणार नाही, याची दक्षता घेऊ. लेखा परीक्षण विभागाला लागलेल्या आगीत दोन-तीन संगणक, काही कागदपत्रे व फर्निचरचे नुकसान झाले आहे. सुदैवाने अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने ही आग वेळेतच आटोक्यात आली. लेखा परीक्षण विभागाची जी काही कागदपत्रे जळाली असतील, त्याच्या प्रती इतर ठिकाणीही साठवून ठेवलेल्या आहेत. त्यामुळे बँकेच्या कामकाजात काही अडचण येणार नाही. शिवाय त्या कागदपत्रांच्या इतर कॉपीही इतर शाखांमध्ये असतात. त्यामुळे अडचणी येणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आता बँकेच्या इमारतीचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आगीच्या कारणांचाही शेध घेतला जात आहे.