आळंदीत विठ्ठल-रुक्मिणी धर्मशाळेच्या इमारतीला आग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आळंदी येथील भागीरथी नाल्याजवळ असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी ट्रस्ट या धर्मादाय जुन्या धर्मशाळेच्या लाकडी इमारतीला अचानक आग लागली. फ्रीजमध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाल्याने ही आग लागली असून यावेळी घरातील सिलेंडरचा स्फोट झाला. यात जुन्या लाकडी इमारतीने पेट घेतला. या घटनेत इमारतीचे आणि त्यातील साहित्याचे प्रचंड नुकसान झाले, मात्र सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. सतर्कतेमुळे जीवित हानी टळली. सुमारे तीन तासांनंतर आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन यंत्रणेला यश आले.

भागीरथी नाल्याजवळ असलेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्ट मिळकत मालमत्ता क्रमांक 2172 ही जुनी लाकडी बांधणीची इमारत आहे. या धर्मशाळेत अनेक वर्षांपासून पांडुरंग क्षीरसागर, बाळू क्षीरसागर, मुकुंद क्षीरसागर आणि क्षीरसागर परिवार धर्मशाळेचे कामकाज पाहत आहेत. अचानक फ्रीजमध्ये बिघाड होऊन शॉर्ट सर्किटमुळे फ्रीजचा स्फोट झाला. त्यानंतर इमारतीला आग लागली. पहिल्या मजल्यावरून खाली आगीने पेट घेतला. या घटनेमुळे घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने आणखी वेग घेतला. यावेळी परिसरात खळबळ उडाली. यावेळी अग्निशमन यंत्रणेत काम करीत असलेला एक जवान गुडघ्यावर पडल्याने जखम झाला. अशाही धावपळीत आग विझविण्याचे काम करून त्याने सामाजिक बांधिलकी जोपासली.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, मात्र वित्त हानी खूप झाली. सुमारे तीन तासांहून जास्त वेळ आग विझवण्यासाठी प्रयत्न करावे लागले, अशी माहिती मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी यावेळी दिली. यासाठी अग्निशमन विभाग प्रमुख अक्षयकुमार शिरगिरे, विद्युत विभाग व पाणी पुरवठा प्रमुख दत्तात्रय सोनटक्के, जयदीप खैरे,अमोल खैरे, विजय पवार,अरुण घुंडरे, प्रसाद बोराटे, अजित घुंडरे, अमित घुंडरे, पोलीस हवालदार मच्छिन्द्र शेंडे, माजी नगरसेवक संतोष चोरडिया, प्रशांत कुऱ्हाडे, भरत गोरे, आकाश जोशी, तुकाराम माने, रुपाली पानसरे आदींनी तसेच परिसरातील नागरिकांनी सतर्क राहून मदत कार्य केले. यामुळे आग आटोक्यात येण्यास मदत झाली. या आगीत घरातील साहित्य, कपडे, भांडी, महत्त्वाची कागदपत्र जळली. येथील रहिवासी क्षीरसागर परिवाराचे प्रचंड नुकसान झाले. यावेळी तीन अग्निशमन वाहने, खाजगी पाण्याचे टँकर, फ्रुटवाले धर्मशाळेतील अग्नी सुरक्षा यंत्रणा वापरून परिश्रमपूर्वक आग विझविण्यात आली.

आळंदी नगर परिषद, चाकण नगर परिषद आणि पीएमआरडीए अग्निशामक दलाचे तीन बंब, खासगी पाण्याचे टँकर, फ्रुटवाले धर्मशाळेती अग्निशमन यंत्रणेचा वापर करून अग्निशामक दलातील सेवक कर्मचारी, आळंदी देवस्थानचे कर्मचारी सेवक, पोलीस कर्मचारी, वीज महावितरणचे कामगार, सुरक्षा जवान, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक आणि पोलीस अधिकारी , महसूल प्रशासन यांनी आग विझविण्यासाठी विशेष सहकार्य केल्याने मोठी दुर्घटना आटोक्यात आली. यावेळी नगरप्रदक्षिणा मार्ग वाहतुकीसाठी काही वेळाकरिता बंद करण्यात आला होता. यावेळी वीज पुरवठा खंडित करून आग विझविण्याचे काम प्राधान्याने करण्यात आले.