श्री अंबाबाई मंदिरातील शिल्पसौंदर्य होणार खुले, मंदिरात 45 वर्षांपूर्वी बसवलेली संगमरवरी फरशी काढण्याचे काम सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ तसेच हेमाडपंथी बांधकामशास्त्राचा अद्भूत नमुना असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संगमरवरी फरशी मंगळवारी सायंकाळपासून काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तब्बल 45 वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या या फरशीमुळे मंदिराचे दडलेले मूळचे शिल्पसौंदर्य आता खुले होऊ लागले आहे.

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराची उभारणी ही हेमाडपंथीय पद्धतीची असून, मंदिराचे कोरीव शिल्पसौंदर्य भक्तांसह पर्यटकांच्या आकर्षणाचा भाग आहे. सन 1976 साली काही भक्तांनी देवस्थान समितीला दानस्वरूपात दिलेली संगमरवरी फरशी मंदिराच्या अंतरंगात लावण्यात आली. अलीकडे दहा-पंधरा वर्षांत मंदिर परिसरात उन्हाचे चटके बसू नये, यासाठी कांचीपुरम फरशी बसविण्याचा प्रयत्नही वादग्रस्त झाला. पुढे मंदिरात भिंतीवरही फरशी बसविण्यात आल्याने बाहेर उन्हाचे चटके, तर आत गरम होण्याचा प्रश्न सुटला नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वादाचा मुद्दा बनलेली ही संगमरवरी फरशी हटवून मंदिरातील मूळचे शिल्पसौंदर्य उजेडात आणण्याची मागणी विविध संघटनांसह भाविकांकडून करण्यात येऊ लागली होती. राज्य पुरातत्व विभागाने मंदिराच्या अंतरंगातील संगमरवरी फरशी हटवण्याच्या सूचना देवस्थान समितीला दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर 6 ते 7 वर्षांपूर्वी श्री अंबाबाईच्या गाभाऱयाच्या प्रदक्षिणा मार्गातील भिंतींना लावलेली संगमरवरी फरशी हटविण्यात आली होती. त्यानंतर मंदिराच्या संपूर्ण अंतरंगातील फरशी हटवण्याची मागणीही होऊ लागली.

देवस्थान समितीने 9 महिन्यांपूर्वी हेरिटेज व आर्द्रता कमिटीकडे फरशी हटवण्याबाबत शिफारस मागितली होती. काही दिवसांत या दोन्ही कमिटींनी परवानगी दिल्यानंतर मंदिराच्या कासव चौकातील छोटी फरशी काढून खाली दडलेल्या दगडी फरशीची पाहणी करण्यात आली होती. त्यानंतर मंदिरातील सर्व ठिकाणची फरशी हटवण्यास देवस्थान समितीला मुहूर्तच सापडत नव्हता. अखेर आता फरशी काढण्यास सुरुवात झाली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत मंदिर व गरुड मंडपातील सर्व फरशी काढण्याचे नियोजन आहे. मंगळवारी मंदिरातील देवीच्या खजिन्याच्या भिंतीला लावलेल्या संगमरवरी फरशीचा काही अंश काढण्यात आला. त्यामुळे दगडी शिल्पसौंदर्य उजेडात आले आहे.

फरशी काढण्यासाठी छन्नी-हातोडय़ाचा वापर

श्री अंबाबाई मंदिराच्या आत जमिनीच्या भागासह देवीचा खजिना कासव चौक, गणपती चौक, महाकाली मंदिर, महासरस्वती मंदिर परिसरात संगमरवरी फरशी, तर गरुड मंडपात साधी फरशी आहे. कोणत्याही यंत्रसामग्रीऐवजी छन्नी व हातोडय़ाचा वापर करून फरशी काढण्यात येणार आहे. फरशी काढल्यानंतर मूळ शिल्पाला लावलेले सिमेंटही सावधगिरीने काढून उजेडात आलेले शिल्पसौंदर्य अधिक खुलवण्यासाठी राज्य पुरातत्व विभागाशी चर्चा करून कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी दिली. यावेळी हेरिटेज समितीचे पदाधिकारी तसेच अंबाबाई मंदिराचे व्यवस्थापक महादेव दिंडे, देवस्थान समितीचे सुयश पाटील उपस्थित होते.