
ऐतिहासिक व सांस्कृतिक ठेवा असणाऱ्या 347 वर्षांपूर्वीच्या वरळी किल्ल्याला लवकरच गतवैभव मिळणार आहे. आकर्षक झाडांची लागकड, रोषणाई, माहिती व दिशादर्शक फलक, बेसॉल्ट दगडाच्या पायकाटांसह डागडुजी करून किल्ल्याचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून करण्यात येणाऱ्या या जीर्णोद्धाराचा शुभारंभ शुक्रवारी मान्यवरांच्या हस्ते झाला.
पालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागाद्वारे वरळी किल्ल्याचा जीर्णेद्धार व सभोवतालच्या परिसराच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या जीर्णोद्धार कामाचे भूमिपूजन आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी माजी महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री शिवसेना उपनेते सचिन अहिर, माजी नगरसेवक आशीष चेंबूरकर, हेमांगी वरळीकर, जी दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे आदी उपस्थित होते. किल्ला जीर्णोद्धाराच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, नागरी नियोजन सल्लागार मे. जीएसए आणि पुरातन वास्तू जतन सल्लागार विकास दिलावरी यांचे सहकार्य लाभले आहे.
असे होणार काम
– वरळी किल्ल्याच्या जीर्णेद्धार कामात सभोवतालच्या परिसराचे सुशोभीकरण आणि परिसरामध्ये आकर्षक प्रकाशझोत प्रणाली बसविण्यात येणार आहे.
– यामध्ये प्रामुख्याने स्थापत्य स्वरूपाची कामे करण्यात येणार असून तटबंदीची डागडुजीदेखील करण्यात येणार आहे.
– किल्ल्याच्या पश्चिमेकडील बाजूस व दक्षिणेकडील बाजूस समुद्रकिनारी असलेल्या मोकळय़ा जागेत सुरू, समुद्रफुल इत्यादी झाडांची आकर्षक लागवड करण्यात येणार आहे.


























































