माझं रक्त सांडेन पण पश्चिम बंगालचे विभाजन होऊ देणार नाही! ममता बॅनर्जींनी भाजपला ठणकावलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाजपच्या काही नेत्यांनी पश्चिम बंगालमधून वेगळे राज्य बनवण्याची मागणी केल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना ठणकावलं आहे. मंगळवारी त्या म्हणाल्या की, राज्याचे विभाजन करण्याच्या अशा प्रयत्नांना हाणून पाडण्यासाठी आपण स्वत:चे रक्त सांडण्यास तयार आहोत.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी, राज्यात ‘अलिप्ततावादाला चालना देण्याचा प्रयत्न केल्याबद्दल’ भाजपवर निशाणा साधत, टीएमसी अध्यक्षा म्हणाल्या की, उत्तर बंगालमधील सर्व समुदाय अनेक दशकांपासून एकोप्यानं जगत आहेत.

‘निवडणुका जवळ आल्यावर, भाजप वेगळ्या राज्याच्या मागणीला जोर लावत आहे… कधी गोरखालँड, तर कधी उत्तर बंगालचे वेगळे राज्य. मी माझे रक्त द्यायला तयार आहे, पण राज्याचे विभाजन कधीही होऊ देणार नाही,’ असं बॅनर्जी यांनी पक्षाच्या एका बैठकीत बोलतानाना सांगितलं.

कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशनचे नेते जीवन सिंघा यांच्या एका कथित व्हिडीओच्या संदर्भात, बॅनर्जींनी वेगळ्या कामतापूरच्या मागणीला विरोध केल्यास ‘रक्तपाताची’ धमकी दिली, TMC अध्यक्षा मात्र अशा धमक्यांना घाबरत नसल्याचं म्हणाल्या.

‘काही लोक मला धमक्या देत आहेत, मला पर्वा नाही. मी अशा धमक्यांना घाबरत नाही,’ असं त्या पुढे म्हणाल्या.