संत वामनभाऊंच्या दिंडीचे पहिले रिंगण उत्साहात संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

श्री क्षेत्र गहिनीनाथगड ते पंढरपूर संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पहिले रिंगण जामखेडलगत असलेल्या जमादारवाडी येथील संत वामनभाऊ महाराज गड येथे शुक्रवारी दुपारी तीन वाजता मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत हभप विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार, 29 जूनला श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे पंढरपुरकडे प्रस्थान झाले. गहिनीनाथ गड, निवडुंगा, वाहली, सावरगाव, केकानवस्ती, वनवेवाडी, मातकुळी असा प्रवास करत शुक्रवारी जांबवाडी येथे सकाळी दिंडी दाखल झाली. जामखेड शहरात आगमन होताच भक्तांनी दिंडीचे स्वागत केले. येथे मानाचा अभंग होऊन रिंगण सोहळा सुरू झाला.

मंदिराच्या भव्य प्रांगणात मध्यभागी पालखी रथ उभा करण्यात आला होता. पताकाधारी वारकरी, विणेकरी टाळ मृदंगाच्या तालावर पुंडलिक वरदे हरी विठ्ठल …हा जय जयकार करत भरधाव वेगाने पालखीला प्रदक्षिणा करू लागले. त्या पाठोपाठ दिंडीतील दोन अश्व धावू लागले. या अश्वांनी परिसरातून आलेल्या भाविकांच्या डोळ्याचे पारणे फेडले. यावेळी भाविकांनी एकाच जय जयकार केला. वारकरी परंपरेचे खेळिया प्रकरणातील अभंग झाले या अभंगाच्या चालीवर अनेक महिला व पुरुष भक्तांनी फुगडीचा आनंद घेतला. यावेळी दादासाहेब महाराज सातपुते, बाळकृष्ण महाराज राऊत ऋषिकेश महाराज माने व संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.

या भागातून पंढरपूरला जाणारी संत वामनभाऊ महाराज यांची ही सर्वात मोठी दिंडी आहे. या एकमेव दिंडीचे येथे रिंगण होते. त्यामुळे या परिसरातील भक्तगणांसाठी ही पर्वणीच ठरते. या दिंडीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. राज्यभरातून सुमारे 25 हजारांहून अधिक वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. या रिंगण सोहळ्यानंतर पुढे जमादारवाडी येथे भोजन करून सारोळा येथे ही दिंडी मुक्कामी पोहोचली.