
सातारा जिह्यात सर्वाधिक जीएसटी कर भरण्यात रेठरे बुद्रूक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखाना आघाडीवर आहे. 2021-22 या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने जीएसटी करापोटी 22 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या जीएसटी कर प्रणालीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, शासनास सर्वाधिक जीएसटी कर उपलब्ध करून दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाने कारखान्याचा विशेष गौरव केला आहे.
शासनाची तिजोरी मजबूत करण्यामध्ये करांचा वाटा मोठा असतो. विविध संस्थांच्या आणि व्यवसायांच्या माध्यमातून शासनाकडे दरवर्षी मोठी रक्कम कररूपाने गोळा होत असते. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन आर्थिक वर्षांत सर्वच संस्थांना मोठय़ा आर्थिक अडचणीतून वाटचाल करावी लागली; मात्र अशा परिस्थितीतही कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत सहकार व उद्योग क्षेत्रात स्वतःची छाप पाडली आहे.
2021-22 या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने शासनाकडे जीएसटी करापोटी 22 कोटी रुपयांचा भरणा केला आहे. शासकीय महसुलामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल वस्तू व सेवाकर विभागाच्या उपायुक्त टी. डी. मोरे यांच्या हस्ते कृष्णा कारखान्याचे कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी राज्य कर उपायुक्त ठाणेकर, सोरटे, कारखान्याचे फायनान्स मॅनेजर जयेंद्र नाईक, टॅक्स अकाउंटंट विठ्ठल साळुंखे उपस्थित होते.
2021-22 या आर्थिक वर्षात कृष्णा कारखान्याने 22 कोटींचा जीएसटी कर भरला आहे. याशिवाय व्हॅट म्हणजेच मूल्यवर्धित करापोटी सुमारे 90 कोटींचा भरणा शासनाकडे केला आहे. त्यामुळे जीएसटी आणि व्हॅट कर भरण्यात कृष्णा साखर कारखाना आघाडीवर राहिला आहे.
सह्याद्रीने भरले 38 कोटी 79 लाख
सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने वस्तू व सेवा कर कायद्याखाली 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये सर्वाधिक कराचा वेळेत भरणा केल्याबद्दल वस्तू व सेवा कर दिनाचे औचित्य साधून, वस्तू व सेवा कर खात्याने कारखान्याचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला. कारखान्याने वस्तू व सेवा कराचा केलेला एकूण भरणा रुपये 38 कोटी 79 लाख रुपये आहे. याबद्दल कारखान्याला सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. कारखान्याचे डेप्युटी चिफ अकाउंटंट ए. पी. पाटील व विजय देसाई यांनी या सन्मानचिन्हाचा स्वीकार केला.

























































