कवीचा परिचय – अंजली कुलकर्णी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंजली कुलकर्णी या पुणे येथील नामवंत लेखिका असून त्या एमए (मराठी साहित्य) व एलएलबी आहेत. त्या मराठी स्त्रीवादी कवयित्री /लेखिका असून त्यांची आजवर एकूण 17 पुस्तके प्रकाशित झाली आहेत.  मी एक स्त्री जातीय अस्वस्थ आत्मा, संबद्ध, बदलत गेलेली सही, रात्र, दुःख आणि कविता हे कवितासंग्रह तसेच संभ्रमाच्या पाण्यात गटांगळय़ा, हृदयस्पर्शी हे ललित लेख संग्रह, पोलादाला चढले पाणी ही अनुवादित कादंबरी प्रसिद्ध आहे. याखेरीज त्यांनी 2 वैचारिक लेख संग्रह, चरित्र लेखने, बालकविता संग्रह तसेच 4 पुस्तकांचे संपादन असे लेखन क्षेत्रात मोलाचे काम केले आहे. त्यांना आजवर उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा केशवसुत पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लोककवी यशवंत पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा कुसुमताई देशमुख पुरस्कार, कामगार साहित्य परिषदेचा सह्याद्री पुरस्कार, ना. सी. फडके प्रतिष्ठानचा पुरस्कार, ग. दि. माडगुळकर प्रतिष्ठानचा पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे यांचा ज्येष्ठ कवीला दिला जाणारा राजकवी भा. रा. तांबे पुरस्कार आणि अन्य 25 पुरस्कार प्राप्त झाले आहेत.हिंदी, इंग्लिश, नेपाली भाषांमधून त्यांच्या कवितांचे अनुवाद प्रकाशित झाले आहेत. ‘बदलत गेलेली सही’ हा कविता संग्रह पुणे विद्यापीठात एम.ए. मराठी (स्वायत्त) अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला आहे.

मूळ कविता – निस्सीम मैत्र

एका स्त्री एका पुरुषाशी मैत्र आहे.
ही घटना आता फार प्राचीन झालीय.
सवयीची म्हणावी इतकी साधी झालीय.
संवेदना आहेत तिथे व्यक्त होणं आलं.
मैत्रीत व्हावं तितकं ते स्वाभाविक झालं.
तिची कलासक्ती तिचं कवीपण
मित्राने जपावं. त्याला पोषणमूल्य पुरवावं.
तिचे त्रागे, अडचणी त्याने ऐकून घ्यावं
तिचं ओघवतं काव्य जाणावं
तिच्या पंखात बळ भरावं
तिचा हक्काचा मित्र व्हावं
तिनंही कधी श्रोतेपण घ्यावं
त्याचा बिनसला कप्पा हेरावा
तिथं त्याला सकार पुरवावा
त्याच्या सर्जकतेची बीजं जाणावीत आधी
ती आणून हौसे पेरावीत कधीकधी
मुद्दाम बुद्धिसंतोषी वाद घालावेत
पाहिलेल्या सिनेमा-नाटकांची
आवडीची चर्चा घडवावी
मैत्रीत निस्सीम उत्कटता असावी
बंधात एक कोवळीक जपलेली असावी
दोन सवयींचे गृहीत धागे असतील का त्या बंधात
त्यांना इतके चपखल जोडून घेणारे!
की ती स्त्री आणि तो पुरुष
फक्त मानवी रेषा झाल्या असतील आता
अतूट मैत्रीच्या गुंफणीतल्या!

-अंजली कुलकर्णी