मला बालमजूर म्हणून सोमालियातून इंग्लंडमध्ये आणले होते, इंग्लंडचा ‘गोल्डन रनर’ फराहचा खळबळजनक खुलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंग्लंडला ऑलिम्पिकमध्ये चार तर जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत सहा सुवर्णपदके मिळवून देणारा माजी मॅरेथॉन धावपटू मोहम्मद फराह याने स्वतःबद्दल खळबळजनक खुलासा करीत मोठी खळबळ उडवून दिली आहे. माझे मूळ नाव मोहम्मद फराह नसून मला वयाच्या आठव्या वर्षी सोमालियातून बालमजूर म्हणून इंग्लंडला आणण्यात आले होते. माझे मूळ नाव हुसैन अब्दी कहिन आहे, असा खुलासा फराहने बीबीसीच्या ‘द रियल मोहम्मद फराह’ या लघुपटावर (डॉक्युमेंटरी) बोलताना केला.

इंग्लंडला ऑलिम्पिकमधील अॅथलेटिक्सचे पहिले सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या मोहम्मद फराहने आपल्या बालपणातील वेदनादायी इतिहासाची उजळणी केली. तो म्हणाला, सोमालियात गृहयुद्धात माझे वडील मारले गेले. तेव्हा मी चार वर्षांचा होतो. त्यानंतर ब्रिटनच्या एका महिलेने मला बालमजूर म्हणून स्वतःच्या सेवेसाठी ब्रिटनमध्ये आणले. तेव्हा मी आठ वर्षांचा होतो. या महिलेने खोटय़ा कागदपत्रांच्या मदतीने मला स्वतःसोबत आणले होते.

पिटी शिक्षक अॅलन वॉटकिन्सन यांनी मला घडवले

ब्रिटनमध्ये अतिशय हालात दिवस काढत असताना इंग्लंडमधील पिटी शिक्षक अॅलन वॉटकिन्सन माझ्या आयुष्यात देवदूतासारखे आले. त्यांनी मैदानातील माझी प्रतिभा ओळखत मला मॅरेथॉन धावायला शिकवले. अॅथलेटिक्सच्या मैदानातूनच मी पुन्हा आयुष्यात उभा राहिलो, अशी कबुली फराह याने दिली. वॉटकिन्सन मला नेहमी म्हणायचे, मोहम्मद तुला एकाच भाषा समजते ती म्हणजे अॅथलेटिक्स ट्रकची. त्यांचा विश्वास सार्थ ठरवत मी आजवर मॅरेथॉन स्टार पदावर पोचलोय. 2000 मध्ये मला ब्रिटनचे अधिकृत नागरिकत्व मिळाले. आता मी यशाच्या शिखरावर असताना माझ्या मुलांनी मला खरे बोलायला प्रवृत्त केले म्हणूनच मी माझा खरा पूर्वेतिहास सांगतोय, असे फराह शेवटी म्हणाला.

धावपटू फराहची अॅथलेटिक्समधील सोनेरी कारकीर्द

मुख्य स्पर्धा         सुवर्ण  रौप्य  कास्य
ऑलिम्पिक           4     –      –
जागतिक स्पर्धा       6     2      –
डायमंड लीग         1     –      –
वर्ल्ड मॅरेथॉन (प्रमुख ) 1   –      1