एका ‘जलसमाधी’ची 75 वर्षे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रामकृष्ण बळवंत बुटेपाटील

जागतिक महासत्तेचं स्वप्न पाहणाऱ्या हिंदुस्थानसारख्या खंडप्राय देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आनंदाने साजरा करण्याच्या या वर्षात स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला जी दुर्दैवी घटना घडली तिच्या स्मृती आजही हिंदुस्थानींच्या मनात खोलवर घर करून राहिल्यामुळे अमृत महोत्सवाच्या आनंदात विरजन पडण्याची शक्यता आहे.

स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला एक दुर्घटना घडली, त्याला 75 वर्षे पूर्ण झाली. तो दिवस होता 17 जुलै 1947 चा. आषाढातील ती दुर्दैवी गटारी अमावस्या! दोन-तीन दिवस पाऊस ढगफुटीसारखा कोसळत होता. सर्वच संपर्क यंत्रणा बंद पडल्यामुळे अशी भयंकर दुर्घटना मुंबईच्या जवळच घडूनसुद्धा दिवसभरात मुंबईत काहीच समजले नाही. सायंकाळी रामदास बोटीचा कप्तान पोहत पोहत कुलाब्याच्या किनाऱ्याला लागला तेव्हा म्हणजे दुसऱ्या दिवशी रामदास बोटीला समुद्राने पोटात घेतल्याची वार्ता रेडिओवरून प्रसारित झाली. मुंबईत या बातमीने लोकांमध्ये आपापसात चर्चा सुरू झाली आणि लोक हळहळ व्यक्त करू लागले.

तब्बल 75 वर्षांपूर्वीची ही दुर्घटना. ‘एस. एस. रामदास’ ही कोकण किनाऱ्यावर प्रवासी आणि सामान वाहतूक करणारी आरामदायी अवाढव्य बोट होती. तीन मजल्याच्या चार वर्गातून साडेसहाशे प्रवासी घेऊन जाणारी ही बोट होती सिंदीया स्टीमशिप कंपनीची उपकंपनी बॉम्बे स्टीम नेवीगेशनला मुंबईपासून गोव्यापर्यंत कोकणातील प्रवाशांची वाहतूक करण्याची मक्तेदारी असलेली ही कंपनी मान्सूनमधील वादळ असो, धुवाधार पाऊस असो, प्रवासी निर्धास्तपणे प्रवास करीत असत, कारण तिचा अवाढव्य आकार आणि क्षमता. प्रवाशांना घेऊन निघालेली ‘एस. एस. रामदास’ बोट रेवसजवळ बुडाली आणि साडेतीनशे ते चारशे प्रवाशांना जलसमाधी मिळाली. तिच्या उत्खननाचा मात्र पाऊणशे वर्षांत कधीच प्रयत्न झाला नाही… काय झाले असेल त्या रामदास बोटीचे आणि दुर्दैवी प्रवाशांचे! आषाढी अमावास्येचा तो दुर्दैवी दिवस. मुंबईवर सतत दोन दिवस कोसळणाऱ्या पावसाला उसंत नव्हती. सकाळपासूनची जोरदार पर्जन्यवृष्टी आणि जोरदार वादळी वारा. अशातच भाऊच्या धक्क्यावर ‘रामदास’ प्रवासाला सज्ज झाली. तुफान वादळाची चाहुल लागली होती. तरीसुद्धा दोन अडीचशेच्या वर प्रवासी नेहमीसारखे बोटीवर चढले. बोटीवरचे सगळे ध्वज जोरजोरात फडफडत होते. जणू काही येणाऱ्या संकटाची ती पूर्वसूचनाच असावी. बोटीचा अनुभवी कप्तान मुल्ला मात्र द्विधा मनःस्थितीत होता. घरी जाण्यासाठी अधीर झालेले सराईत प्रवासी कप्तानाला म्हणाले, ‘कोणत्याही वादळाला तोंड देणारी ही कणखर ‘रामदास’ बोट आहे. चला हांका बोट. अखेर सकाळी साडेदहाला बोटीने नांगर उचलला आणि ती रेवसकडे दीड-एक तासाच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली. डाव्या बाजूने काशाचा खडक ओलांडला की दहा पंधरा मिनिटांतच रेवसला पोहोचणार होती, परंतु दुर्दैव असे की…

ती अमावस्येची उधाणाची भरती सुरू झाली. सहा-सात फूट उंचीच्या लाटांचे जोरदार तडाखे बोटीवर आदळायला सुरुवात झाली. तेव्हा मात्र सगळे प्रवासी भयभीत झाले. इतक्यात डोळय़ाचे पाते लवते न लवते तोच एका महाकाय अजस्त्र लाटेच्या धडकेने बोट कुशीवर कलंडली. सर्व प्रवासी सैरावैरा धावत सुटले. कप्तानाने सावधानता बाळगून बोट मुंबईला परत नेण्यासाठी उलटी फिरवायचा प्रयत्न केला आणि नेमक्या त्याच वेळी बोटीवर आदळलेल्या एका महाकाय लाटेने बोट उलटी पालटी केली. बुडत्या बोटीवर एकच हाहाकार उडाला. ती प्रचंड आकाराची ‘रामदास’ बोट उसळलेल्या सागराने क्षणात गिळंकृत केली. काही प्रवासी बाहेर फेकले गेले तर काहींना बोटीसह समुद्राने कवटाळले. प्रवाशांसह रामदास बोटीला जलसमाधी मिळाली.

पट्टीचे पोहणारे फळकुटांचा आधार घेऊन अर्धमेल्या अवस्थेत अलिबाग परिसरातील किनाऱ्याला लागले. दोन दिवसांनी कुलाबा, सासवणे, आवास, किहिम गावांच्या चौपाटीवर मृत शरीरे वाहत आली. सासवण्यातील आबा कर्वे नावाच्या पोहून आलेल्या सुदैवी प्रवाशाकडून काही वर्षांनंतर माहिती काढून मधुसूदन फाटक यांनी ती इत्थंभूत माहिती स्मृतीत जपून ठेवली. पुढे ही ‘चक्षुर्वैसत्यं’ माहिती जनतेपर्यंत पोहोचली.

संपूर्ण कोकणपट्टीवर इतका दारुण अपघात यापूर्वी कधीही झाला नव्हता. ‘रामदास’ बोटीचे अवशेष शोधून काढण्याचा प्रयत्न झाला नाही. एस. एस. रामदास बोट विस्मृतीत गेली. काशाचा खडक मात्र आजही या दुर्दैवी घटनेचा साक्षीदार मूकपणे वर्षानुवर्षे स्थितप्रज्ञासारखा उभा आहे.