
पुणे शहरातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात मागील वर्षभरापासून फरार असलेल्या सराईताला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने अटक केली. आरोपी मूळ उत्तरप्रदेशातील असून पुण्यात वास्तव्यास आहे.
सिद्धांत यादव (रा. ललितपुर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. यादव याच्यावर अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या गुन्ह्यात पोलिसांचे पथक यादव याचा मागील वर्षभरापासून शोध घेत होते.
दरम्यान गुन्हे शाखा युनिट दोनचे पथक हद्दीमध्ये गस्त घालत असताना संशयित आरोपी हा कोरेगाव पार्क पुलाखाली थांबला असल्याची माहिती हवालदार शंकर नेवसे यांना मिळाली. यानुसार युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अंमलदार कादीर शेख ,शंकर नेवसे, नागनाथ राख यांनी सापळा रचून यादव याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता तो गुन्हात सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. यानुसार यादव याला अटक करण्यात आली आहे.
अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक वैशाली भोसले,अंमलदार शंकर नेवसे, कादिर शेख, नागनाथ राख, साधना ताम्हाणे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.



























































