भयंकर! एका चपातीसाठी जीव घेतला, जेवायला बसलेल्या रिक्षावाल्याचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजधानी दिल्ली एका भयंकर हत्याकांडाने हादरली आहे. करोल बागा भागामध्ये क्षुल्लक कारणावरून एका रिक्षाचालकाचा खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मुन्ना (वय – 40) असे हत्या झालेल्याचे नाव असून फिरोज खान असे आरोपीचे नाव आहे.

मंगळवारी (26 जुलै) सकाळच्या सुमारास पोलिसांनी करोल बाग भागामध्ये एक व्यक्ती रस्त्यावर निपचित पडल्याची माहिती मिळाली. पोलीस पोहोचेपर्यंत स्थानिक लोकांनी रिक्षाद्वारे सदर व्यक्तीला आरएमएल रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी करोल बाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस चौकशीमध्ये लखन नावाच्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, मंगळवारी रात्री 10 च्या सुमारास विष्णू मंदिर मार्गावर मुन्ना आपले काम संपवून भूक मिटवण्यासाठी जेवायला बसला होता. जवळच्याच एका हॉटेलमधून त्याने स्वत:साठी जेवण आणले होते. याचदरम्यान एक दारूडा त्याच्याजवळ आला आणि खायला मागू लागला. मुन्नानेही आपल्या घासातील घास काढून एक चपाती दारूड्याच्या हातावर ठेवली.

यानंतर दारूड्याने आणखी एक चपाती मुन्नाकडे मागितली. मात्र मुन्नाने नकार देताच दारूड्याने त्याला शिवीगाळ सुरू केली. मुन्नाने याला विराध करताच दारूड्याने आपल्याजवळील चाकू काढला आणि त्याच्यावर सपासप वार केले. हा प्रकार लक्षात येताच आपण आरोपीचा 400 ते 500 मीटरपर्यंत पाठलाग केल्याचेही प्रत्यक्षदर्शीने सांगितले, मात्र तो फरार झाला. यानंतर एका रिक्षाद्वारे मुन्नाला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. पोलिसांच्या पथकाने रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या आणि उद्यानात आसरा घेणाऱ्यांकडे चौकशी सुरू केली. अखेर पोलिसांच्या मेहनतीला फळ आले आणि आरोपी पोलिसांच्या हाती लागला. पोलीस चौकशीमध्ये आरोपीने आपला गुन्हाही कबूल केला. पोलिसांनी घटनास्थळाचे सीसीटीव्हीही मिळवले असून आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला चाकूही जप्त केला.