
झारखंड येथील दुमकामध्ये एका अल्पवयीन हिंदू मुलीची जाळून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी एका मुस्लीम तरुणाला अटक करण्यात आली असून या घटनेनंतर दुमका येथे तणाव निर्माण झाला आहे.
या घटनेतील पीडितेचे नाव अंकिता कुमारी असं आहे तर आरोपीचं नाव शाहरुख हुसैन असं आहे. 23 ऑगस्ट रोजी अंकिता हिच्या घरात घुसून त्याने तिच्यावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. गेल्या सहा दिवसांपासून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, रविवारी तिचा मृत्यू झाला. तिच्या अंत्यसंस्कारावेळी तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. अनेक नागरिक रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करू लागले. परिस्थिती चिघळल्याचं लक्षात येताच पोलिसांनी कलम 144 लागू केलं.
अंकिता कुमारी हिच्या वडिलांचं दुमका येथे दुकान आहे. शाहरुख खूप दिवसांपासून तिची छेडछाड करत होता. त्याने तिचा फोन नंबर मिळवून तिला त्रास द्यायला सुरुवात केली. तो तिच्यावर प्रेमसंबंधासाठी दबाव देखील आणत होता. मात्र, त्याच्या मागणीला अंकिताने विरोध केला होता. त्यावर चिडलेल्या शाहरुखने अंकिताला तिच्या कुटुंबासह ठार मारण्याची धमकीही दिली होती.
23 ऑगस्ट रोजी अंकिता जेव्हा आपल्या घरी झोपली होती, तेव्हा शाहरुखने तिच्या घरात प्रवेश केला आणि तिच्यावर पेट्रोल टाकून आग लावली. या मुळे ती खूप गंभीररित्या भाजली होती. तिच्या कुटुंबाने तिला रुग्णालयात दाखल केलं. त्यानंतर तिला मोठ्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथे अंकिताचा जीव वाचू शकला नाही. मृत्युपूर्वी काही तास आधी अंकिताने शाहरुख विरोधात जबाब दिला.
शाहरुख हा संबंधित परिसरातील वाया गेलेला तरुण असून त्याच्याविरोधात आधीही तक्रारी आल्या होत्या. शाहरुखला अटक करण्यात आली असून त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नसल्याची माहिती मिळत आहे.




























































