
स्पेनचा सुपरस्टार राफेल नदालने अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी लढतीत रिफ्लेक्स ऍक्शनने स्वतःची रॅकेट स्वतःच्या नाकावर मारून घेतली. त्याचे नाक या आघाताने फुटल्याने टेनिस कोर्टवर डॉक्टरांना बोलवावे लागले. नदाल इटलीच्या फॅबिओ फॉगनिनीशी झुंजत असताना ही दुर्घटना घडली. अखेर निर्णायक सेटमध्ये जखमी होऊनही खंद्या सेनापतीच्या थाटात राफेलने ही लढत 2-6, 6-4, 6-2, 6-1 अशी जिंकत आपल्या झुंजार वृत्तीचे प्रदर्शन घडवले.
या सामन्यात एका क्षणी नदालने स्वतःलाच गंभीर जखमी करुन घेतले नदालच्या नाकावर टेनिसचे रॅकेट लागल्याने त्याला जखम झाली आणि रक्त वाहू लागले होते. नदाल रॅकेट नाकावर लागल्यानंतर कोर्ट सोडून बाहेर गेला आणि झोपला. त्यानंतर तातडीने डॉक्टर आले आणि त्यांनी नदालवर प्रथमोपचार केले. या दुखापतीनंतरही नदालने पुढील तीन पॉइंट मिळवत चौथा सेटही आपल्या नावावर करत विजयावर शिक्कामोर्तब केले.
नदालचा ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ बाणा
फॉगनिनीविरुद्धच्या पुरुष एकेरी लढतीत शेवटच्या सेटमध्ये नदाल 3-0 ने पुढे असतानाच हा विचित्र अपघात घडला. नदालने उजवीकडे जात हात लांब करून चेंडू परत टोलवला. त्यानंतर त्याचे रॅकेट कोर्टवर आदळले आणि थेट त्याच्या नाकाला लागले. प्रेक्षकांना काही कळण्यापूर्वीच नदालने खेळ थांबवला. रॅकेट टाकले आणि तो नेटच्या बाजूला असणारा पंचांच्या कक्षाजवळ जाऊन पाठ टेकवून झोपला. त्यानंतर डॉक्टरांनी येऊन नदालच्या नाकावरील रक्त पुसले आणि प्रथमोपचार केले. त्यानंतर जणू काही घडलेच नाही अशा थाटात नदाल पुन्हा खेळण्यासाठी उभा राहिला.
व्हिडीओने उलगडला नदालच्या दुखापतीचा प्रकार
नदालच्या नाकाला रॅकेट कसे लागले हे स्लो मोशनमध्ये मोठय़ा पडद्यावर दाखवण्यात आल्यानंतर प्रेक्षकांनी एकाच वेळी ‘ओहहह…’ असे म्हणत आश्चर्य व्यक्त केले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून जगातील अव्वल खेळाडूंपैकी एक नदाल याने अशा पद्धतीने स्वतःला दुखापत करून घेतल्याने समालोचकांनीही आश्चर्य व्यक्त केले. मात्र अशा वेळी शरीर वेगाने चेंडू किंवा रॅकेटपासून बाजूला घेण्याऐवजी खेळावर लक्ष्य केंद्रित केलेले असते. त्यामुळे अशा दुर्घटना घडतात, असेही एका समालोचकाने निरीक्षण नोंदवताना सांगितले.
विल्यम्स भगिनी सलामीलाच पराभूत
महिला दुहेरीत तब्बल चार वर्षांनी टेनिस कोर्टवर उतरलेल्या व्हीनस विल्यम्स आणि सेरेना विल्यम्स जोडीला अमेरिकन ओपनच्या महिला दुहेरीत सलामीलाच लुसी हेराडेका आणि लिंडा नोस्कोवा या झेक प्रजासत्ताकच्या जोडीने 7 -6 (5), 6 -4 असे पराभूत केले. व्हीनस आणि सेरेना भगिनींनी महिला दुहेरीत 14 ग्रॅण्डस्लॅम विजेतीपदे जिंकली आहेत. दुहेरीत पराभूत झालेल्या विल्यम्स भगिनींच्या जोडीला प्रेक्षकांनी पराभूत होऊन कोर्टबाहेर जाताना उभे राहून अभिवादन केले.




























































