
मुसळधार पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात रविवारी 25 ठिकाणी पाणी शिरण्याच्या घटना घडल्या आहेत. तर 10 ठिकाणी झाडे पडली असून दोन ठिकाणी भिंत कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने घटनेत जीवितहानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
आंबील ओढा परिसरातील वसाहतीत पाणी शिरल्यामुळे रहिवाशांची तारांबळ उडाली होती. तर हडपसर, आंबील ओढा वसाहत, चंदननगर भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. रविवारी मध्यरात्रीपर्यंत अग्निशमन दलाचे जवान ठिकठिकाणी मदतकार्य करीत होते. हडपसर गाडीतळ भागात एका घरात पाणी शिरले होते. अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन घरातून तीन महिलांची सुटका केली.
घोरपडी गाव परिसरातील घरात अडकलेल्या ज्येष्ठ महिलेची सुटका केली. मुसळधार पावसामुळे शहरात 25 ठिकाणी पाणी साठण्याची घटनांची नोंद करण्यात आल्याची माहिती अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली. मध्यरात्रीपर्यंत शहराच्या वेगवेगळ्या भागात 10 ठिकाणी झाडे पडली. सोमवारी सकाळी पाषाण रस्त्यावरील पंचवटी भागात मोटारीवर झाड कोसळले. जवानांनी वेगवेगळ्या भागात झाडे पडल्यानंतर मदतकार्य केले. झाडांच्या फांद्या बाजूला काढून रस्ते वाहतुकीस खुले करण्यात आले



























































