‘बेस्ट’च्या वीज बिलावरील ‘ईडी’ची जाहिरातबाजी थांबवा, शिवसेनेची जोरदार मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘बेस्ट’च्या वीज बिलावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो छापून सुरू असलेली जाहिरातबाजी तातडीने थांबवावी अशी मागणी शिवसेनेने केली आहे. याबाबत शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी ‘बेस्ट‘ महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांना निवेदन दिले आहे.

आगामी पालिका निवडणुका डोळय़ांसमोर ठेवून भाजपकडून प्रत्येक सरकारी उपक्रमाच्या माध्यमातून पक्षाचा प्रचार केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. आता तर ‘बेस्ट’च्या वीज बिलावरही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. याआधी ‘बेस्ट’च्या पूर्ण बसवर भाजपने जाहिरातबाजी करून ‘बेस्ट’च्या लोगोलाच दुय्यम स्थान दिल्याचे समोर आले आहे. यातच आता घराघरात पोहोचणाऱया ‘बेस्ट’च्या लाईट बिलावरही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे फोटो छापून जाहिरातबाजी करण्यात आली आहे. मुंबईकरांच्या जिव्हाळय़ाचा प्रश्न असलेली ‘बेस्ट’चा राजकीय फायद्यासाठी वापर होत असल्याबद्दल ज्येष्ठ शिवसैनिक सुबोध महाले यांनी संताप व्यक्त केला आहे. तर सरकारची जाहिरातबाजी ‘बेस्ट’च्या लौकिकास साजेसी नसल्याचे अनिल कोकीळ म्हणाले.