मुंबईकरांना मिळणार सक्षम डिजिटल सेवा, महापालिकेच्या इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व्हिजनचे उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईकरांना केंद्रस्थानी ठेवून सर्व खात्यांनी एकसमान उपयुक्त तंत्रज्ञानाचा वापर करावा यासाठी मुंबई महापालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व्हिजन-2025’ धोरण तयार केले आहे. या धोरणाचे अतिरिक्त महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. दरम्यान, पुढील तीन वर्षांमध्ये डिजिटल/संगणकीय कामे करताना आवश्यक मार्गदर्शक स्वरूपाची तत्त्वे या धोरणामध्ये नमूद करण्यात आली आहेत.

मुंबईकरांना पुरविण्यात येणाऱया डिजिटल सेवा सुलभ, सक्षम आणि सुरक्षित करणे या उद्देशाने महापालिकेच्या माहिती-तंत्रज्ञान विभागाने ‘इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी व्हिजन 2025’ आखले आहे. केवळ आपल्या खात्यापुरता नव्हे तर संपूर्ण महापालिका प्रशासनाच्या दृष्टीने साकल्याने विचार करून तंत्रज्ञान अमलात आणणे, महापालिकेचा प्रत्येक विभाग डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करत असताना एकमेकांची प्रणाली वापरासाठी पूरक व अडथळाविरहित ठरली पाहिजे, जागतिक स्तराच्या तुलनेत प्रशासन मागे राहू नये यासाठी अत्याधुनिक तांत्रिक बाबींचा सातत्याने स्वीकार करणे, केंद्र व राज्य सरकारने आखून दिलेल्या निकषांचे पालन करून तंत्रज्ञानाचा प्रत्यक्षात वापर होतो आहे, यावर लक्ष देणे, तंत्रज्ञानाचा उपयोग करून आर्थिक काटकसर साध्य करणे, महसुलात वाढ करणे, महापालिकेचे अंतर्गत व आस्थापनाविषयक सर्व कामकाज संगणकीकृत करणे अशी महत्त्वाची उद्दिष्टे नजरेसमोर ठेवून हे धोरण आखण्यात आले आहे.

यावेळी माहिती-तंत्रज्ञान संचालक शरद उघडे यांच्यासह माहिती-तंत्रज्ञान विभागाचे मुख्य विश्लेषण अधिकारी शुभेंद्र कानडे, व्यवस्थापक राजेंद्र फणसे, अमित गडेकर, अरुण चव्हाण, सहाय्यक अभियंता डेनिस फर्नांडिस, सहाय्यक अभियंता मीनल शेटये आदी यावेळी उपस्थित होते.

कर्मचाऱयांसाठी संकेतस्थळ
महापालिका कर्मचाऱयांसाठी समर्पित, स्वतंत्र संकेतस्थळाचे अनावरणही यावेळी झाले. मुंबई महापालिकेत एक लाखाहून अधिक अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. कर्मचाऱयांसाठी mybmcemp.mcgm.gov.in हे संकेतस्थळ तयार केले असून कर्मचाऱयांसाठी केल्या जाणाऱया सूचना, निर्देश, घोषणा, नियोजित उपक्रम, प्रकल्प, कार्यक्रम यांची माहिती, विविध खात्यांची परिपत्रके, प्रशिक्षण कार्यक्रम, महत्त्वाची धोरणे, छायाचित्रे, उपयुक्त व सहाय्यकारी ठरणाऱया चित्रफिती अशी निरनिराळी वैशिष्टय़े यामध्ये समाविष्ट आहेत.