
हिंदुस्थानी संगीत क्षेत्रात अगदी नाटय़संगीतापासून ते सिनेमातील गानविश्व व्यापल्यानंतरही, अनेक गायक-गायिकांनी मातृभाषेबरोबरच इतर भाषांमध्येही विपुल गाणी गायली. लता-आशा-उषा या भगिनी तर आहेतच, पण हिंदीमध्ये एक काळ गाजवणाऱया सुलोचना चव्हाण (त्यावेळी कदम) आणि ललिता फडके (त्यावेळी देऊळकर) अशा अनेक गायिका आहेत. मराठी संगीतकारांनी तर हिंदी गानविश्व समृद्ध करण्यात मोलाचं योगदान दिलं. मग ते शास्त्र्ााrय संगीत असो, नाटय़-चित्रसंगीत असो वा भावसंगीत. हीच परंपरा देशातल्या अगदी टोकाच्या प्रांतातील गायक-गायिकांनीही जोपासली. त्यासाठी अनेकांनी सिनेसंगीताच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी उत्कर्षनगरी मुंबई गाठली. तर काही अल्प भाषिक गायक-गायिकांचं, महाराष्ट्राच्या या राजधानीशी बालपणापासूनच नातं जुळलं. शंकर महादेवन, श्रेया घोषाल ही त्याततली अलीकडची नावं आणि त्यातलंच एक महत्त्वाचं सुरेल नाव हरिहरन यांचं.
त्यांचा जन्म 3 एप्रिल 1955 रोजा केरळची राजधानी तिरुवनंतपुरम (तेव्हाचं त्रिवेंद्रम) येथे झाला असला तरी शिक्षण मुंबईत माटुंग्याच्या डॉन बॉस्को शाळेत आणि महाविद्यालयीन शिक्षण शीव (सायन) येथील एसआयईएस कॉलेजातून झालं. त्यामुळे मराठी वातावरण आणि संस्कृतीचा जवळून परिचय त्यांना लहानपणापासूनच झालेला आहे.
मुख्यत्वे गजल आणि भजन गायनासाठी प्रसिद्ध असलेल्या हरिहरन यांची हिंदी आणि तामीळ गाणी, त्यातही शेकडो चित्रपटगीतं प्रसिद्ध आहेत. एकूण सुमारे 15 हजार गाणी (किंवा जास्तच) त्यांनी गायली असतील. त्यात दाक्षिणात्य भाषेत अधिक असली तरी हिंदीत चित्रपटासाठी आणि काही टीव्ही मालिकांसाठीही त्यांनी सुस्वर गीतं गायली. 1977 मध्ये, ऐन विशीत असताना हरिहरन यांना ‘सूरसिंगार’चा प्रथम पुरस्कार मिळाला. त्यानंतर लगेच 1978 मध्ये जयदेव यांचं संगीत असलेला ‘गमन’साठी त्यांनी ‘अजीब सानेहा मुझपर गुजर गया यारों’ हे गीत गायलं आणि ते अतिशय गाजले. त्यानंतर हरिहरन यांना मागे वळून पाहावं लागलंच नाही. त्यांच्या या गाण्याला उत्तर प्रदेश सरकारतर्फे दिलं जाणारं ‘उत्कृष्ट गीता’चं पारितोषिकही मिळालं. ही गजल त्यांना नवी ओळख करून गेली.
1992 पासून तामीळ सिनेगीतांमध्ये त्यांनी जम बसवला. पुढे हिंदी सिनेसंगीताचे महाद्वार त्यांच्यासाठी उघडलं. अनू मलिक यांच्या संगीतात हरिहरन यांनी ‘बॉर्डर’ चित्रपटासाठी ‘मेरे दुश्मन मेरे भाई’ गायलं. ते चांगलंच गाजलं. ‘माचिस’मधलं सुरेश वाडकर, विशाल भारद्वाज यांच्यासह त्यांनी ‘चप्पा चप्पा चरखा चले’ या त्या काळात तरुणाईला वेड लावणाऱया गाण्यात आपला सूर मिसळला होता.
ए. आर. रहेमान यांचा ‘रोझा’ चित्रपट आला आणि वैशिष्टय़पूर्ण संगीतकार म्हणून रहेमानचं जसं नाव झालं तसंच हरिहरन यांनी स्वर दिलेली सगळीच गाणी प्रचंड गाजली. त्यातली ‘तू ही रे।़।़’ किंवा ‘रोजा जाने मन’ ही गाणी आठवा. ‘भारत हम को जान से प्यारा है’ हे स्फूर्तिदायक, रोमांचकारी गाणंही आठवत असेलच. त्याशिवाय इतर गाण्यांपैकी ‘चंदा रे’, ‘दिवाने दिल’, ‘पंधो से मिलते हैं पंधे’ वगैरे गाणीही गाजली. विशेष म्हणजे त्यांनी किशोरदांचे ‘आंधी’ चित्रपटातलं ‘तेरे बिना जिंदगी से शिकवा तो नही’ हे गाणंही उत्कटतेने गायलंय. लतादीदींबरोबर ‘एक दुजे के वास्ते’सुद्धा गायलं.
लेस्ले लेविससह कोलोनिअल कझिन्स हा टू-मेम्बर बॅण्ड असो वा ‘हनुमान चालिसा’चे रेकॉर्डिंग हरिहरन सर्वत्र लोकप्रिय ठरले. ‘गझल’चे ‘आबशार-ए-गझल’ (आशा भोसलेंसह) तसंच ‘गुलफाम’ असे त्यांचे कितीतरी ‘हिट’ आल्बम प्रसिद्ध झाले. 2004 मध्ये त्यांच्या गानकारकीर्दीचा सन्मान ‘पद्मश्री’ देऊन करण्यात आला.
आता त्यांची मराठी गानकारकीर्द. त्यांचं अलीकडचं सर्वत्र प्रसिद्ध गाणे ‘जोगवा’ चित्रपटातलं सं. कृ. पाटील यांचं, अजय-अतुल यांचे प्रभावी संगीत असलेले ‘जीव दंगला, गुंगला रंगला असा; पिरमाची आस तू जीव लागला, लाभला ध्यास हय़ो तुझा’ हे गाणं प्रचंड गाजलं. आजही गाजतंय. याशिवाय गजेंद्र अहिरे लिखित, भास्कर चंदावरकर यांनी संगीत दिलेलं पंठ आणि आभाळ दाटून येतो हे त्यांचं शंकर महादेवनबरोबरचं द्वंद्वगीत. अहिरे यांनी आणि चंदावरकर यांचे संगीत लाभलेलं ‘सांज झाली तरी माझ्यातरी’ हे ‘सरीवर सरी’ चित्रपटासाठीचं युगलगीत साधना सरगम यांच्यासह आणि ‘जीव रंगला’मध्ये सहगायिका आहेत श्रेया घोषाल. तुलनेने हरिहरन यांची मराठी गाणी कमी असली तरी मराठी संगीतकारांनी अशा भावपूर्ण स्वरांची साथ घेतली तर अधिक गाणी आपल्याला ऐकता येतील. अर्थात हे सारं गाण्याचं स्वरूप चित्रपट, संगीताचा बाज यावर अवलंबून असतं म्हणा!
गेल्या वेळच्या लेखात आपण केरळमध्येच जन्मलेल्या येशूदास यांच्याविषयी वाचलं. योगायोग असा की हरिहरन यांना त्यांच्याही नावाचं ‘येशूदास अॅवॉर्ड’ मिळालंय.
एक गोड गळय़ाच्या दाक्षिणात्य, पण मुंबईकर गायक असलेल्या हरिहरनकडून मराठी रसिकांना उत्तम मराठी गाणी मिळाली आहेत. एवढं नक्की.
>> अरुण जोशी































































