Video – तुफान राडा! आधी धक्का, मग बुक्का; एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, जीममध्ये महिलांची ‘दंगल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लोकलमध्ये महिलांची किंवा शाळा-कॉलेजमध्ये तरुणींची भांडणे काही नवीन नाहीत. एकदा का महिला भांडायला लागल्या मग त्या कोणाचंही ऐकत नाही. चर्चेने सोडवता येईल असा मुद्दा कधी गुद्द्यावर येतो कळतच नाही. अगदी पुरुषांप्रमाणे हाणामारीही होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आलेल्या महिला क्षुल्ल्क गोष्टीवरून एकमेकींच्या झिंज्या उपटू लागतात.

सध्या फिटनेस राखण्याचे पेव आले आहे. त्यासाठी गल्लीबोळामध्ये फिटनेस सेंटर आणि जीमही सुरू झाल्या. जीममध्ये जाऊन वर्कआऊट करून तुम्ही थकला असाल आणि अचानक एखाद्याने तुम्हाला धक्का मारला तर? हेच व्हायरल व्हिडीओमध्ये घडले असून जीममधील एका मशीनवर सेट पूर्ण करण्यासाठी वाट पाहत असलेल्या महिलेला तिसऱ्याच महिलेने धक्का दिला आणि मग सुरू झाली फायटिंग.

Bahar Ke Kalesh नावाच्या एका ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला स्मिथ मशिनवर तिचा सेट पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या महिलेचा सेट पूर्ण होईपर्यंत वाट पाहते. ती महिला सेट पूर्ण करून गेल्यावर महिला पुढे सरकते. मात्र तिसरी महिला तिथे येते आणि तिला धक्का देते. यावरून दोघींमध्ये तुफान हाणामारी सुरू होते. दोघीही एकमेकींच्या झिंज्या उपटू लागतात. हा प्रकार लक्षात येताच जीममध्ये व्यायाम करण्यासाठी आलेल्या महिलांना मध्यस्थी करावी लागली.

दरम्यान, सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 3 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून हजारो लोकांनी लाईक केला आहे. यावर प्रतिक्रियांचाही पाऊस पडला आहे.