मनीष सिसोदिया यांना सीबीआयचे समन्स, 17 ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अबकारी धोरण प्रकरणात सीबीआयने समन्स बजावलं आहे. त्यांना सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

यानंतर सिसोदिया यांनी ट्वीट केलं आहे. ते म्हणाले की, माझ्या घरी 14 तास सीबीआयची धाड करवली गेली, काहीही सापडलं नाही. माझा बँक लॉकर तपासला त्यात काही निघालं नाही. माझ्या गावातही त्यांना काहीही सापडलं नाही. आता यांनी मला उद्या 11 वाजता सीबीआय मुख्यालयात बोलवलं आहे. मी जाईन आणि पूर्ण सहकार्य करेन. सत्यमेव जयते, असं ट्वीट सिसोदिया यांनी केलं आहे.

दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयतर्फे दाखल केलेल्या तक्रारीत मनीष सिसोदिया यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यांचं नाव संशयित आरोपींच्या यादीत सर्वप्रथम असल्याने सीबीआयच्या तपासाचा केंद्रबिंदू सिसोदिया असणार आहेत. सिसोदिया यांच्या खेरीज 14 अन्य आरोपींची नावं तक्रारीत नमूद आहेत.

सिसोदिया यांच्यावर अबकारी विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या मद्य परवान्यासाठी खासगी विक्रेत्यांना 144 कोटी 36 लाख रुपयांचा नफा मिळवून देण्याचा आरोप आहे. या प्रक्रियेदरम्यान इतक्या रकमेचं परवाना शुल्क माफ केलं गेलं, ज्यामुळे सरकारचं नुकसान झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे.