
‘‘ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोणत्या पक्षाचे बळ किती, यावरून नेहमीच उलटसुलट संख्या समोर येत असते. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकाही पक्षांच्या चिन्हांवर घेतल्या जाव्यात. यातून कोणाची ताकद किती आहे, हे नेमके समोर येईल,’’ अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे.
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यावेळी अकोले दौऱयावर आलेले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
अजित पवार म्हणाले, ‘‘राज्यासह देशातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका, तसेच नगरपालिका, महानगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षांच्या चिन्हांवर लढविल्या जातात. त्यामुळे निकालानंतर चित्र स्पष्ट होते. मात्र, ग्रामपंचायत निवडणुका पक्षांच्या चिन्हांवर लढविल्या जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपणच पुढे असल्याचा दावा करतो.’’
‘‘सध्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातलेला आहे. अद्यापि पाऊस सुरू आहे. अजूनही पाऊस सुरू राहील, असे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अतिपावसामुळे शेतकऱयांचे नुकसान होत आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. सरकारकडून मदत मिळालेली नाही, असे येथील शेतकरी सांगतात. खरीप हंगाम गेलाच आहे. मात्र, आता पावसामुळे रब्बीचेही नुकसान झाले आहे. ही वस्तुस्थिती जनतेसमोर मीडियाच्या माध्यमातून यायला हवी,’’ असे मतही त्यांनी व्यक्त केले.
कुणी म्हटलं म्हणून ‘मशाल’ विझणार नाही!
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘मशाल विझणार’ असे व्यक्तव्य केले होते. यावर अजित पवार म्हणाले, ‘‘कोणी म्हणते म्हणून ‘मशाल’ विझणार नाही, ‘घडय़ाळ’ बंद पडणार नाही. मीडिया नेत्यांच्या वक्तव्यातील एक-एक वाक्य घेऊन एकमेकांविरुद्ध बोलायला भाग पाडते. हे असले धंदे बंद करा आणि बेरोजगारी, महागाई असे लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडायला हवे, असा टोलाही अजीत पवार यांनी माध्यमांना लगावला.
‘त्या’ कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत करा
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अकलापूर (ता. संगमनेर) येथे येऊन विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या चार मुलांच्या आई-वडिलांचे सांत्वन केले. तर, ‘शबरी योजने’तून दोन घरकुले मंजूर करून देण्यासंदर्भात आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी तत्काळ मोबाईलवरून संवाद साधला. त्यानंतर या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत करण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱयांना दिल्या आहेत.
























































