
देवेंद्र भगत
प्रचंड वेगाने उभी-आडवी वाढणाऱया मुंबईत आगीसारख्या दुर्घटनाही वाढत आहेत. त्यामुळे होणारी जीवित-वित्तहानी टाळण्यासाठी नागरिकांनी जबाबदारीने वागणे गरजेचे आहे. नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास, नियम पाळल्यास बचावकार्यासाठी अग्निशमन दलाची ‘ताकद’ वाढेल, असा विश्वास मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची धुरा खांद्यावर घेतलेल्या संजय मांजरेकर यांनी दैनिक ‘सामना’शी बोलताना व्यक्त केला.
अग्निशमन दलासमोरील आव्हाने कोणती?
देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आता ‘आकाशाच्या दिशे’ने सर्वाधिक वाढत आहे. टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. अशा 70 मीटरवरील इमारतींमध्ये फायर फायटिंग सिस्टम नेहमी सक्षम ठेवणे अनिवार्य आहे. मात्र आगीच्या दुर्घटनेनंतर बहुतांशी ठिकाणी ही यंत्रणा ठप्प असल्याचे समोर येते. यामुळे जीवित-वित्तहानी वाढते. हे टाळण्यासाठी नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून अग्निशमन यंत्रणा सुरू ठेवली पाहिजे.
यावर अग्निशमन दल कसे काम करतेय?
अग्निशमन दल, वॉर्डचे असिस्टंट इंजिनीअर आणि असिस्टंट इंजिनीअर बिल्डिंग अॅण्ड फॅक्टरी यांच्या माध्यमातून संयुक्तरीत्या मुंबईभरात तपासणीची कार्यवाही नियमितपणे सुरू असते. यावेळी फायर फायटिंग सिस्टम बंद असल्यास नोटीस देऊन 120 दिवसांत ही यंत्रणा सुरू करण्याचे निर्देश देण्यात येतात, मात्र या यंत्रणेचा नियमित वापर होत नसल्याच्या मानसिकतेतून याकडे दुर्लक्ष केले जाते. ही बाब घातक ठरते. त्यामुळे मुंबईकरांनी जबाबदारीने वागल्यास अग्निशमन दलाची ताकद वाढेल.
टोलेजंग इमारतींसाठी काही नव्या उपाययोजना?
पालिकेकडे सध्या 90 मीटर म्हणजे 30 व्या मजल्यापर्यंत पोहोचून आग विझवता येईल अशी शिडी आहे. मात्र यावरील आगीचे आव्हान ठरते. त्यामुळे 70 मीटरवरील इमारतींमध्ये प्रिंकलरसह फायर फायटिंग सिस्टम, फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट सक्षम ठेवणे बंधनकारक आहे. जुन्या इमारतींच्या प्रत्येक मजल्यावर फायर एक्सटिंग्युशर ठेवणे बंधनकारक आहे, तर अग्निशमन दलाच्या ताफ्यात आता हायराइज फायर फायटिंग व्हेईकल आणली आहे, ज्यामुळे 40 व्या मजल्यापर्यंतच्या आगीवर नियंत्रण मिळवता येईल. शिवाय स्वयंचलित रोबोटही आहे. जवानांची रिक्त 910 पदे डिसेंबरपर्यंत भरण्यात येणार आहेत.
सुरक्षेसाठी मुंबईकरांना काय आवाहन कराल?
मुंबईतील 80 टक्के आगी शॉर्ट सर्किटने लागल्याचे समोर येते. त्यामुळे दर पाच वर्षांनी प्रत्येकाने आपल्या घरातील, संस्थेतील वीज यंत्रणेचे फायर ऑडिट करून आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत. अग्निशमन दलाकडून सोसायटय़ा, रुग्णालये, आस्थापनांच्या ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱया प्रशिक्षणामध्ये सहभाग घेतला पाहिजे. त्यामुळे जागरूक आणि जबाबदार मुंबईकरांमुळे दुर्घटनांची तीव्रता कमी होऊन जीवित-वित्तहानी टाळण्यास मोठा हातभार लागेल.



























































