
देवदर्शनाला निघालेल्या एका रिक्षातील प्रवाशांना मालट्रकने धडक दिल्याने एका मुलीचा मृत्यू झाला असून, सातजण गंभीर जखमी झाले आहेत. भरदुपारी मार्केटयार्डजवळ हा अपघात झाला आहे.
मिसबा थुकूर मुलाणी (वय 14, आदर्शनगर, शेळगी) असे मृत मुलीचे नाव आहे, तर रुकसाना कोरबू, जन्नत कोरबू, हसीन शबीर कोरबू, अलिम थुकूर कोरबू, नौशाद सूरज कोरबू, मुजीर पठाण, मोहम्मद साद हे जखमी झाले आहेत.
शेळगी येथील कोरबू, पठाण आणि साद कुटुंबीय रिक्षातून देवदर्शनासाठी निघाले होते. मार्केटयार्डजवळ रिक्षा आली असता, समोरून आलेल्या ट्रकने त्यांच्या रिक्षाला धडक दिली. यात रिक्षातील सर्व प्रवासी गंभीर जखमी झाले होते. उपचारांसाठी जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, मिसबा मुलाणी या मुलीचा मृत्यू झाला. सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
























































