
नवनाथ शिंदे
लॉकडाउननंतर गेलेल्या नोकरीमुळे अनेकांना आर्थिक कोंडमारीला सामोरे जावे लागले होते. नेमकी तीच संधी साधून खासगी सावकरी करणार्यांनी गोरगरिबांना रक्कम देउन व्याजापोटी अव्वाच्या सव्वा टक्केवारीने लुबाडणूक केली. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. त्यामुळे खासगी सावकारीचे प्रस्थ मोठे असल्याचे जाणावताच पुणे पोलिसांनी अवैध सावकारीला वेसन घालण्यास सुरूवात केली. गुन्हे शाखेकडून खंडणीखोरांसह बेकायदेशिररित्या सावकारी करणार्यांविरूद्ध थेट गुन्हे दाखल करून त्यांची रवानगी कारागृहात केल्यामुळे संबंधितांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. कारवाईच्या भीतीने अनेक सावकार आता कर्जदारांकडून व्याज न घेता फक्त मुद्दल घेउन व्यवहार मिटवत आहेत.
मुला-मुलींचे शिक्षण, लग्न समारंभ, आजारपणासह विविध अडचणींचा सामना करताना सर्वसामान्य नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. अशातच मागील दोन वर्षांपुर्वी कोरोना संसर्गामुळे अनेकांच्या नोकरीवर गदा आली. उद्योगधंदा, हॉटेल व्यवसाय ठप्प झाल्याने आर्थिक समस्या निर्माण झाल्या. त्याचवेळी अवैधरित्या सावकारी करणार्यांनी बाजारात अव्वाच्या सव्वा दराने पैसे देण्यास सुरूवात केली. कुटूंबियांच्या गरजा भागविण्यासाठी आणि संसाराचा गाडा चालविण्यासाठी नागरिकांकडून व्याजाने रक्कम घेण्याशिवाय पर्याय नव्हता. मात्र, सावकरांनी प्रतिशेकडा तब्बल 5 ते 30 टक्क्यापर्यंत वसुली करण्यास सुरूवात करताच नागरिकांना धडकी भरण्यास सुरूवात झाली. अशारितीने बेकायदेशिररित्या सावकारी करीत खंडणी उकळणार्यांची माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना मिळाली होती. त्यानुसार प्रत्येक पोलीस ठाण्यातंर्गत सावकारी करणार्यांची माहिती गोळा करण्यात आली.
अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना तक्रारीचे आवाहन केले होते. त्यानुसार बेकायदेशिर सावकारी करणार्यांविरूद्ध खंडणी विरोधी पथकांनी कारवाईची मोहीम हाती घेतली. त्यातच गोरगरीबांनी घेतलेल्या मुद्दलच्या बदल्यात जादा व्याज उकळणे, त्यांना मारहाण करणे, कुटुंब संपविण्याची धमकी देणे, अपहरण करण्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या. त्यापार्श्वभूमीवर धमकावून नागरिकांकडून व्याज वसूल करणार्या सावकारांचा बिमोड करण्यासाठी खंडणी विरोधी पथकांसह स्थानिक पोलिसांनी प्राधान्य दिले. त्यामुळे तक्रार प्राप्त होताच पाोलिसांकडून कारवाईच्या धास्तीने सावकारांकडून आम्हाला व्याज नको फक्त मुद्दल परत द्या, आम्ही जादा घेतलेले पैसेही माघारी देतो, पोलिसांकडे तक्रार करू नका अशी विनवणी कर्जदारांना करण्यात आली. मागील दोन वर्षांत तब्बल 125 सावकारांना इंगा दाखविण्यात आला आहे. त्यासाठी खंडणी विरोधी पथक एकचे पोलीस निरीक्षक अजय वाघमारे आणि खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांच्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. पोलीस ठाण्यातंर्गत आतापर्यंत 31 गुन्हे दाखल केल्यामुळे सर्वसामान्यांची लुटमार थांबण्यास मदत झाली आहे.
अवैध सावकारीविरूद्ध तक्रारीला प्राधान्य द्या
पथारीवाल्यांकडून हप्ता घेणे, छोट्या-मोठ्या व्यावसायिकांकडून दरमहिन्याला खंडणी गोळा करणे, किरकोळ व्यावसायिकांना धमकावून वसुली करणार्यांची माहिती काढली जात आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे व्याजाने पैसे देउन फ्लॅट आणि मोकळ्या जागेच्या खरेदी खत बळकाविण्याच्या घटनांना आळा बसला आहे. तसेच वाहनांच्या मालकी हस्तांतरणाच्या पिळवणुकीला लगाम घालण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे खासगी सावकारीचे ग्रहण कमी झाल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, सावकारांकडून पठाणी वसुलीमुळे कर्जदारांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे अवैध सावकारीद्वारे गोरगरिबांची आर्थिक फसवणूक करणार्यांची खैर नसल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास संबंधितांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
दोन वर्षांत सावकरांविरूद्ध कारवाईचा बडगा
सन 2021 सन 2022
एकूण गुन्हे- 24 28
गुन्हे शाखेकडून दाखल गुन्हे- 9 12
पोलीस ठाण्याकडून दाखल – 15 16
अटकेतील सावकार- 68 37
बेकायदेशिररित्या अवैध सावकारीविरूद्ध कारवाई करण्यात आल्यामुळे सर्वसामान्य कर्जदारांसह नागरिकांची लुटमार थांबली आहे. विशेषतः हप्तेखोर, खंडणीखोर आणि अवैध सावकरांचा फास आवळल्यामुळे गोरगरिबांची फसवणूक टाळण्यास मदत झाली आहे. काही सावकारांकडून अव्वाच्या सव्वा दराने टक्केवारी घेत गरिबांचे आर्थिक शोषण केले जात होते. त्यांच्याविरूद्ध कारवाई करीत तक्रारदारांना न्याय देण्यात आला आहे.
– अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर
कर्जदारांकडून अव्वाच्या सव्वा दराने व्याज वसुली करणार्या सावकारांविरूद्ध गुन्हे शाखेकडूनही कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली होती. त्याअनुषंगाने आतापर्यंत गुन्हे शाखेने 30 गुन्ह्यातील 61 सावकारांना जेरबंद केले आहे. अवैध सावकारांविरूद्ध कारवाईची मोहीम सुरूच राहणार आहे.
– रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर




























































