निळवंडे येथील नरभक्षक बिबटय़ा मोकाटच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अकोले तालुक्यातील निळवंडे धरण परिसरातून शनिवारी (दि. 10) राजूर वन विभागाला एका बिबटय़ाला पकडण्यात यश आले आहे. मात्र, वृद्धेवरील हल्ल्यातील बिबटय़ा हा नसल्याने ग्रामस्थांमध्ये आजही दहशतीचे वातावरण आहे.

निळवंडे येथील कोकणेवाडी व परिसरातील खडकेवस्तीवर रखमाबाई खडके नामक दिव्यांग वृद्धेचा 24 नोव्हेंबर रोजी बिबटय़ाच्या हल्ल्यात मृत्यू झाला. येथून काही अंतरावरील शिवारात राजूर वन विभागाने लावलेल्या पिंजऱयात बिबटय़ा अडकला. त्यामुळे ग्रामस्थांनी नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला असला, तरी वृद्धेवर हल्ला करणारा बिबटय़ा अद्यापि मोकाट आहे. या परिसरातून अजूनही काही बिबटय़ांचा संचार सुरू आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी फिरताना सतर्क राहावे. पाळीव जनावरांना बंदिस्त ठेवावे. घर किंवा पशुधनाच्या गोठय़ाचे दरवाजे उघडे ठेवू नयेत. घराशेजारीच उघडय़ावर झोपू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राजूर येथून एक बिबटय़ा जेरबंद झाला. त्यानंतर शनिवारी दुसरा बिबटय़ा निळवंडे धरण परिसरातून जेरबंद झाला. या बिबटय़ांची रवानगी संगमनेर तालुक्यातील निंबाळे रोपवाटिकेत करण्यात आली असल्याची माहिती वनक्षेत्रपाल राजश्री साळवे यांनी दिली.