
कुलाबा पोलीस ठाण्यात दाखल एका गुह्यात मदत करण्यासाठी एक लाखाची मागणी करून 30 हजारचा पहिला हप्ता घेताना पोलीस कॉन्स्टेबलला ऍण्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहाथ पकडले. त्या कॉन्स्टेबलसह लाच मागणाऱया सहाय्यक निरीक्षकाला अटक करण्यात आली.
किरण (नाव बदललेले) यांच्या विरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुह्यात मदत करतो असे सांगत सहाय्यक निरीक्षक वैभव पेठकर (51) यांनी किरणकडे एक लाख रुपयांची मागणी केली. लाच द्यायची नसल्याने किरणने ऍण्टी करप्शन ब्युरोकडे तक्रार दिली. दरम्यान, गुरुवारी पथकाने तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या पडताळणीवेळी पेठकर यांनी एक लाखाची मागणी करून पहिला हप्ता 30 हजार रुपये अंमलदार विलास भांडकोळी (37) यांच्याकडे देण्यास सांगितल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लावलेल्या सापळय़ात किरणकडून 30 हजारांची लाच घेताना भांडकोळी रंगेहाथ सापडले. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पेठकर आणि भांडकोळी या दोघांनाही अटक करण्यात आली.




























































